Maharashtra Legislative Council Election 2024: मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Legislative Council Election) पार पडणार आहेत. त्यात आता या विधानपरिषद निवडणुकीवरून सध्या राजकारण (Maharashtra Politcs) तापायला सुरुवात झाली आहे. राज्यातील राजकीय पक्ष आपले उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर करत आहेत. त्यातच मनसेनं (MNS) आज कोकण पदवीधर मतदार संघासाठी (Konkan Graduate Constituency) उमेदवार जाहीर केलेला आहे. तर या जागेसाठी भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) देखील सध्या जोरदार तयारी करत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीत नक्की काय होणार? भाजपची रणनीती काय? यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. 


लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला असून 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. पण त्यानंतर,राज्यात, शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचे पडघम सध्या राज्यात वाजू लागलेले आहेत. उमेदवारी मिळण्यापासून विविध चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे.


निरंजन डावखरेंसाठी भाजपही आग्रही 


महाराष्ट्रातील राजकीय पक्ष विधान परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले असून कोकण पदवीधर मतदार संघामध्ये आजच मनसेनं अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे दोन वेळचे आमदार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीसाठी देखील भाजप आग्रही आहे, तर शिवसेना देखील या जागेसाठी इच्छुक असून लवकरच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये देखील या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. 


विधान परिषदेवरुन महायुतीत पेच? 


लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे आणि शिवसेना एकत्रित युतीत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे मनसेनं जाहीर केलेला उमेदवार मनसेचा की महायुतीचा? अशा देखील चर्चांना उधाण आलं आहे. मात्र भाजपचे दोन वेळचे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि आपणच निवडणूक लढवणार असं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे कोकण पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.


भाजप शिवसेना आणि मनसे यांची लोकसभा निवडणुकीमध्ये युती पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त आता लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, लोकसभा निवडणुका संपताच आता मनसे यांनी आगामी निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे मनसेच्या या उमेदवाराला महायुती पाठिंबा देणार की मनसे आणि महायुती आमने-सामने लढणार हे आता काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे.


कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोण मैदानात? 


कोकण पदवीधर मतदार संघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मनसेनं या जागेवर अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेले दोन टर्म भाजपचे निरंजन डावखरे हे येथून निवडून येतात. निरंजन डावखरे सध्या या ठिकाणी तयारी करत आहेत. लवकरच डावखरेंना उमेदवारी जाहीर होईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे संजय मोरे हे देखील या जागेसाठी इच्छुक आहेत. कोकण पदवीधर जागेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही आग्रही आहेत. ठाकरे गटाकडून सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 


रायगडमधील काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे पक्ष समन्वयक रमेश कीर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. लोकसभेला दिलेल्या पाठिंबा नंतर मनसे उमेदवाराला महायुती पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एक तर या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळेल. अन्यथा महायुती धर्म पाळला तर भाजप मनसे आणि महाविकास आघाडी अशी तिहेरी लढत पाहायला मिळेल. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे देशाच्या दृष्टीनं असलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा फायदा हा मनसेला आगामी निवडणुकांमध्ये होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीमध्ये मनसेला भाजप आणि महायुतीतील इतर पक्ष पाठिंबा देतात का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. अन्यथा या मतदारसंघांमध्ये तिहेरी किंवा चौरंगी निवडणूक पाहायला मिळेल.