शिर्डी : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या  समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रुपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.


शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे.


उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. रुपवते या शिर्डीतून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला. त्यामुळे ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळेच नाराज होऊन उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश करत शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळवली होती. 


उत्कर्षाताई रूपवते यांचे कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन 


रात्री अकोले राजूर ( जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी  राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात असे आवाहन उत्कर्षा रुपवते यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


आणखी वाचा


शिर्डीत तिरंगी लढतीचं वारं, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये, शिंदे अन् ठाकरेंचं टेन्शन वाढणार, मविआला धक्का