पुणे: राज ठाकरे यांच्या मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत वेगळा प्रयोग करण्याची भाषा करणाऱ्या वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. वसंत मोरे यांच्या रुपाने वंचितने पुण्यात तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. यापूर्वी वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा म्हणून परिचित होते. याशिवाय, सोशल मीडियामुळे वसंत मोरे (Vasant More) हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत असते. पुण्यात वसंत मोरे यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. वसंत मोरे हे 2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत. प्रत्येकवेळी ते नवनवीन प्रभागांतून निवडून आलेले आहेत. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील म्हणजे बालाजीनगरपासून अगदी आंबेगाव पठार ते खडकवासला विधानसभा मतदारसंघावर देखील वसंत मोरे यांचा प्रभाव आहे. हडपसर मतदारसंघात तर जवळपास 25 ते 30 हजारांचा मुस्लीम मतदार वसंत मोरे यांच्या मागे उभा आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हे भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यासमोर निश्चितच आव्हान निर्माण करु शकतात. 


गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघांमध्ये वंचित-एमआयएम आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्याप्रमाणावर मतं घेतल्याने काही बड्या राजकारण्यांना पराभवाचा धक्का बसला होता. यामध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही वंचित आघाडीने अशीच कामगिरी केल्यास पुण्यात वसंत मोरे हे भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना घाम फोडू शकतात. सध्याच्या क्षणाला पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांचे पारडे जड मानले जात असले तरी वसंत मोरे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात सभा घेतल्यास दलित मतदार मोरे यांच्या पाठिशी उभा राहू शकतो. याशिवाय, वसंत मोरे हे स्वत: मराठा आहेत. परिणामी मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाजूने असणारा मराठा वर्गही वसंत मोरे यांच्या पारड्यात दान टाकू शकतो. 


वसंत मोरे हे पूर्वी मनसेत होते. आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांचा भाजपशी युती करण्याचा निर्णय मान्य नसलेले मनसेचे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारही वसंत मोरे यांच्या पाठिशी उभे राहू शकतात. याशिवाय, हडपसर मतदारसंघासह पुण्यातील मुस्लीम व्होटबँकही वसंत मोरे यांना पाठिंबा देऊ शकते. तसे घडल्यास वसंत मोरे पुणे लोकसभेत धक्कादायक निकालाची नोंद करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.


वसंत मोरेंकडून मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट


महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर वसंत मोरे यांनी वेगळा पर्याय शोधायला सुरुवात केली होती. कोणत्याही परिस्थितीत पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायचीच, असा चंग वसंत मोरे यांनी बांधला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या मराठा आंदोलकांच्या बैठकीला वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर मोरे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची भूमिका घेतली होती. यानंतर वसंत मोरे यांनी मुंबई राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. 


आणखी वाचा


वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय; पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा