मुंबई : काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या न्याय हक्कासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करुन लढा देणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने (vinesh phogat) 50 किलो वजनी गटातून भारतासाठी पदक फिक्स केलं होतं. विनेशनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आज रात्री 10 वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता. मात्र, सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिंपिंक कमिटीकडून (Olympic) अपात्र घोषित केल्याने 140 कोटी भारतीयांचं सुवर्ण स्वप्न भंगला आहे. विनेश फोगाटवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच ही बातमी आल्याने राजकीय वर्तुळातही त्याचे पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारला (Narendra Modi) लक्ष्य केलं आहे. 


विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स गेले काही दिवस खूप चांगला होता, मग अचानक काय झाले. 50-100 ग्रॅम वजन कसे वाढले. जर ती जिंकून आली तर तिला काही दिवसांपूर्वी जी वागणूक मिळाली होती, तिने जे आंदोलन केले होते. ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असे कोणाला वाटले का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत विनेश फोगाटच्या विजयानंतरही झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी है तो मुमकिन हैं असं म्हणतात, त्यांनी युक्रेन रशिया युद्ध रोखलं असं म्हणतात मग त्यांनी विनेशबाबत जे घडत आहे, ते रोखायला हवं, असंही जयंत पाटील यानी म्हटलं आहे. 


भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र, अंतिम सामन्याआधी विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे, भारतासाठी तिने जिंकलेलं पदही आता भारताला मिळणार नाही. भारताच्या लेकीचा जिंकूनही पराभव झाल्याने संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 


PM मोदींचा पी.टी. उषा यांना फोन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे. 


हेही वाचा


वजन कमी करण्यासाठी पोरीनं रक्त काढलं, तरी 50 ग्रॅम जास्तच भरलं; कुस्तीमधील वजनाचा नियम काय?