मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवार ठरला आहे. भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन याचं तिकीट कापलं आहे. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपनं उज्जल निकम यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजपन विद्यमान खासदार पूनम महाजन यांना मोठा धक्का दिला आहे. उत्तम मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्जल निकम आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, माधुरी दीक्षितने निवडणूक लढण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी जाहिर केली आहे.


पूनम महाजन यांच्यासह मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट


पूनम महाजन यांच्यासह भाजपनं मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट केला आहे. भाजपनं मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांचं तिकीट कापत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. याआधीही भाजपनं मुंबईतील दोन विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. भाजपने मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) आणि  ईशान्य मुंबईतील भाजप खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्यासह आता उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांना भाजपनं दुसऱ्यांदा संधी न देता त्यांचं तिकीट कापलं आहे.


उज्ज्वल निकम महायुतीचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार


उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election) ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे आता महायुतीचे उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता उज्ज्वल निकम यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.