कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी या असनसोल लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होत्या. ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने याठिकाणी जाणार होत्या. दुर्गापूर येथून त्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार होत्या. हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी असलेला लोखंडी जिना चढून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आतमध्ये गेल्या. मात्र, हेलिकॉप्टरच्या दारातून आत गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा अचानक तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. सुदैवाने त्यांच्या अंगरक्षकांनी ममता यांना लगेच सावरले. यावेळी ममता बॅनर्जी यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, ममता बॅनर्जी यांनी आपला दौरा रद्द न करता त्या असनसोल मतदारसंघात गेल्या.


काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी या त्यांच्या निवासस्थानी ट्रेडमिलवर व्यायाम करताना पाय घसरुन पडल्या होत्या. यावेळ त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कपाळावर झालेल्या जखमेतून बराच रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना तात्काळ SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांची ही दुखापत पाहून तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते चिंतेत पडले होते. मात्र, प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले होते. 




गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी अपघातांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. जानेवारी 2024 मध्ये त्या प्रवास करत असताना कारचा ब्रेक जोरात लागल्यामुळे ममता बॅनर्जी समोरच्या बाजूला जोरात आपटल्या होत्या. तेव्हाही त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरु असताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तर 2023 मध्येही त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. तेव्हादेखील ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याला आणि पाठीला दुखापत झाली होती. 


आणखी वाचा


तर मला मृत्यूनेच गाठलं असतं, अपघातानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया