रत्नागिरी : सर्व मंत्रीपदे घेतली आमदारकी, खासदारकी सगळी घेतली, पण माझ्या कोकणासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhhav Thackeray) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर तोफ डागली आहे. विनाशच होणार असेल म्हणूनच देवाचे आशिर्वाद आहे, त्याने शिवसेनेला भाजपापासून दूर केलं. त्यांचा विनाश होणार आहे, त्यांच्यासोबत नका राहू, हेच देवाच्या आशिर्वादाने झालंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 


माझ्या कोकणासाठी काय केलं?


रत्नागिरीमध्ये रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह नितेश आणि निलेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काल कोणत्या पक्षात, आज कोणत्या पक्षात आहे, हे आठवत नाही.  इतके वर्ष स्वत: सकट स्वत:ची पिलावळ, जिकडे सत्ता तिकडे तुम्ही झुकता, सगळी मंत्रीपदे घेतली आमदारकी, खासदारकी सगळी घेतली, पण माझ्या कोकणासाठी काय केलं. एकतरी लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.


भाजपने त्यांच्या कुवतीप्रमाणे मंत्रीपद दिलंय, लघू आणि सूक्ष्म


उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, भाजप हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे मंत्रीपद दिलंय, लघू आणि सूक्ष्म. आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावा लागेल, म्हणजे अतिसूक्ष्म कोरोनाचा जीवाणू दिसेल, पण हे नाही दिसणार एवढे सूक्ष्म होतील हे, पण मस्ती किती. आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात? 


ही माझी वडीलोपार्जित कमाई, याचा मला अभिमान


वर्षानुवर्षे जीवाला जीव देणारे शिवसैनिक जोडलेले आहेत, ही माझी वडीलोपार्जित कमाई आहे, याचा मला अभिमान आहे, हे माझं वैभव आहे.  मोदी म्हणतात आमची घराणेशाही आहे, हो आहे आमची घराणेशाही आहे आणि ती लोकांना मंजूर आहे. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही, बाळासाहेबांचा फोटो लावता, नालायक माणसं अंगामध्ये कर्तृत्व नाही, शिवसेना चोरताय, धनुष्यबाण चोरतात, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत.   


हिंदुह्रदयसम्राटांची घराणेशाही नको, गद्दारांची-गुंडांची घराणेशाही चालते


तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नकोय, हिंदुह्रदयसम्राटांची घराणेशाही नकोय, तुम्हाला गद्दारांची-गुंडांची घराणेशाही चालते, हे दु:ख तुम्हाला नसलं, आम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल. तुम्ही कुणाची घराणेशाही पोसताय, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे काय म्हणाले?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादी लावू नको; शहाजीबापूंची धैर्यशील मोहिते पाटलांवर चौफेर टीका