मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांनी जातपात, धर्म बाजूला ठेवून मतदान केले पाहिजे. कारण आपण टिकलो तर आपण धर्म टिकवू. देशाला वाचवणे हाच आपला धर्म आहे. आशीर्वादासाठी देव पाठिशी हवा पण देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे. आज हे लोक देव समोर ठेवतायत पण देश कुठे टाकलाय हे त्यांनाही कळत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपवाले फक्त रामनामाचा जप करत आहेत. मग भाजपने (BJP) देशात रामराज्यच आणावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) लक्षद्वीप आणि द्वारकेला समुद्राच्या तळाशी जाऊन आले पण त्यांना मणिपूरला जाता येत नाही. रामभक्ती करावी, हे भाजपने आम्हाला सांगण्याजी गरज नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी धारावीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.


या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आम्ही हिंदुत्त्वासाठी भाजपसोबत होतो. पण भाजपने आम्हाला दोनवेळा फसवले. आम्ही भाजपचं आताच हिंदुत्त्व मानत नाही. आमचं हिंदुत्त्व हे घरात चूल पेटवणारं आहे. तर भाजपचं हिंदुत्त्व हे लोकांची घरं पेटवणारं आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.


मी लोकांमध्ये आणि शेतकऱ्यांना सातत्याने भेटत आहे. ग्रामीण भागातील माझ्या सभांना शेतकरी मोठ्याप्रमाणावर असतात. त्यांच्यापैकी अनेकांना मी मविआ सरकारच्या काळात सरकारने केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला का, हे जाहीरपणे विचारतो. ते मदत मिळाल्याचे सांगतात. मात्र, सध्याच्या घटनाबाह्य सरकारने जाहीर केलेली कोणतीही मदत आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही, असे हे शेतकरी सांगत असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. 


आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलोय: उद्धव ठाकरे


आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. भाजपकडे मोदींशिवाय पर्याय आहे का? भाजप तेच प्रोडक्ट वारंवार लाँच करत आहे. आम्ही मोदींविरोधात नव्हे तर हुकूमशाही विरोधात एकत्र येत आहोत. आम्हाला देशातील लोकशाही टिकवायची आहे. आमचा विरोध मोदी किंवा भाजपला नाही तर हुकूमशाही वृत्तीला आहे. त्यामुळे वेगवेगळी विचारसरणी आलेले आम्ही सगळे पक्ष एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


आणखी वाचा


अबकी बार भाजपा तडीपार! चारसो पार कसे जाता हे बघतोच; उद्धव ठाकरेंचं थेट मोदींना आव्हान