मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळ्यात संबोधित केलं. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी शहांची आरती करायची असती अगरबत्ती चिन्ह घेतलं असतं मात्र, खोट्याची लंका पेटवायची असल्यानं मशाल चिन्ह घेतलं, असं म्हटलं. लढायचं असेल तर मैदानात येऊन लढा, शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

Uddhav Thackray : विजयाच्या गुलालात न्हाऊन निघायचं : उद्धव ठाकरे

अजित पवारांच्या प्रकरणात 70 हजार कोटींचा घोटाळा हेच बोंबलले होते. स्वत: पंतप्रधान बोलले होते. अशोक चव्हाण यांच्याबद्दल शहिदांच्या जमिनी बळकावणारे अशी बोंबाबोंब त्यांनी केली होती. आताचा भाजप अमिबा सारखा झालाय. सगळं काही माझ्याच हातात पाहिजे, असं झालंय. मी पणा, अहंमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात न्हाऊन निघायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.    

लोकशाहीची वाट लावलीय, विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही. महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल लागला तो कोणालाच पटत नाही. मत चोरी केली पक्ष चोरी केली काल तर एबी फॉर्म चोरी केली. इथे कशाला थांबता जा चोर बाजारात, खोटी लोकशाही देशातील जनता स्वीकारणार नाही. आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं आहोत. 25 वर्षात आपण काय काम केलं त्याचा पाढा वाचू, आपण मिळवून दाखवलं त्यांनी ते घालवून दाखवलं. आपली मुंबई म्हणून जे केलं तो आपलेपणा भाजपच्या नेत्यामध्ये आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

Continues below advertisement

आपण 92 हजारांच्या ठेवी जमवून ठेवल्या होत्या. रोज बातम्या येतात ठेवी तोडत चाललेत.  2 लाख 30 हजार कोटींची देणी करुन ठेवली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात माझे आजोबा पहिल्या पाचात होते, त्यांच्या घरात जन्माला आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर मुंबईचे लचके तोडत असतील ते बघत बसायला मी काय षंढ वाटलो का? हे मी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी निशाणी मशाल का घेतली, त्यांची लंका पेटवायची आहे. मोदी शहांची आरती ओवाळायची असती तर अगरबत्ती घेतली असती. पण, त्यांची लंका पेटवायची आहे, म्हणून मशाल घेतली आहे. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची आवश्यकता आहे. काल जे गेले होते ना बाबा मला माललं, बाबा तो ओरडला म्हणत दिल्लीला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता टोला लगावला. जेव्हा आम्ही सोबत होतो तेव्हा कोणाची हिम्मत होत नव्हती. जे गेलेत बाजारबुणगे गेलेत, अशी टीका ठाकरेंनी केली. 

2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलं होतं पण अजून आत्मनिर्भर भाजप झालेला नाही. हत्याकांडातील,  ड्रग्जमधील, भ्रष्टाचारातील लोक घेतले जात आहेत. लढायचं तर मैदानात येऊन लढा शिवसेना कधीही तयार आहे, शिवसेना घाबरणारी नाही अजूनही सांगतोय ज्यांना जायचं त्यांनी त्यांच्या गटात जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.