मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सभांचा धडाका सुरू आहे. आपल्या भाषणातून ते मोदी सरकावर हल्लाबोल करत आहेत. राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंनाही त्यांच्याकडून लक्ष्य केलं जात आहे. त्यातच, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला रोखठोक मुलाखत देऊन विविध विषयांवर परखड मतं मांडली आहेत,त्याचा दुसरा भाग आता प्रदर्शित झाला असून दुसऱ्या भागातूनही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) त्यांच्या 10 वर्षातील कारभावरही हल्लाबोल केला. तसेच, त्यांची ठळक 5 कामे सांगत उपहासात्मक टीकाही केली.
नरेंद्र मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या पहिल्या भागात दिला होता. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध होत आहे. आता, दुसऱ्या भागातही त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोटा असल्याचंही त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे गुवाहटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन केला होता, मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, हा दावा त्यांनी खोडून टाकला आहे.
मुलाखतकार खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. नरेंद्र मोदी दहा वर्षं सत्तेत आहेत. त्यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजवला जातोय?. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देताना, म्हणजे काय वाजतोय, असे त्यांनी म्हटले. त्यावर, तुम्हाला मोदींची पाच कामे आठवतात काय? की त्यांनी देशासाठी किंवा समाजासाठी केली आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पाच कामे म्हणजे, पक्ष फोडले, कुटुंबं फोडली, भ्रष्टाचाऱ्यांना स्थान दिलं, निवडणूक रोखे जमवले आणि जनतेची फसवणूक केली.. अशी 5 कामे उद्धवठाकरेंनी मुलाखतीत उपहासात्मकपणे सांगितली. तसेच, वॉर तो रुकवा दी ना पापा या जाहिराताचा उल्लेख होताच, हसत-हसत वाट लगवा दी ना पप्पा…! असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, एवढं मोठं युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं.. मग मणिपूर जे एक वर्ष धुमसतंय ते का नाही थांबवत?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
युद्ध थांबवलं, मग मणिपूर अशांत का?
जर वॉर रुकवलं असेल त्यांनी…तर मणिपूरमध्ये अजूनही अशांतता का आहे? काल-परवासुद्धा मतदानाच्या दिवशी हिंसाचार झाला. गेले वर्षभर हे सुरूच आहे. त्या महिलांची ज्या पद्धतीने धिंड काढली गेली.. तिथले मुख्यमंत्री तर म्हणाले, असे बरेच प्रकार घडले आहेत. स्वतः गृहमंत्री तिकडे जाऊन आले तरी त्यांना हे माहीत नव्हतं? जर ते व्हिडीओ बाहेर आले नसते तर ते जगाला कळलंही नसतं. म्हणजे एवढी ही जी काही दडपशाही चालली आहे.. बातम्याही बाहेर येऊ देत नाहीत.. अत्याचार आजसुद्धा सुरू आहेत. पण ते आपल्यापर्यंत पोहचतच नाहीत. एक वर्ष झालं.. अजूनही मणिपूर अशांतच आहे. त्याबद्दल कोणाच्याही मनात संवेदना दिसतच नाहीत आणि तुम्ही मतं मागताय? मलासुद्धा लाज वाटतेय की, अरे तिथल्या महिलांवर आणि लोकांवर काय परिस्थिती उद्भवली असेल. आतासुद्धा आपण बोलताना तिथे काहीतरी घडतच असेल. मणिपूरबद्दल यांच्या कोणाच्याही मनात संवेदनाच नाहीत?, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.