Eknath Khadse On Uddhav Thackeray: शिवसेना पक्षाची सद्यस्थिती जी आहे, यात उद्धव ठाकरेंनी काय केलं आणि एकनाथ शिंदे यांनी काय केलं, अशा प्रकारे एकमेकांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. धनुष्यबाण मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. यात काही चूका उद्धव ठाकरे यांच्याही असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत. 


न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल, असे वाटत नाही


पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात. काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा, आता तेही संपले आणि तुम्ही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण सर्वजण आशेने पाहत आहोत. मात्र न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल, असे वाटत नाही, असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.


शिवसेनेत दोघांच्या भांडणामुळे भाजपला मजबूत होण्याची संधी


बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली. त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती, त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली आहे. हे राज्याच्या दृष्टीने ही योग्य नाही व शिवसेनेच्या दृष्टीने ही योग्य नाही. मात्र दुसरीकडे यामुळे भाजपला मजबूत होण्याची संधी आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.


वैयक्तिक शत्रुत्वाचे राजकारण सुरू, मात्र त्यामुळे राज्याचा विकास मागे पडतोय


दोन पक्ष राज्यात प्रत्येक पक्ष आपसात भांडत राहिले. आपण एकमेकांना शत्रू सारख मानत राहिले, तर दुसरीकडे यामुळे राज्याच्या विकासावर त्याचा स्वाभाविकपणे परिणाम होतो. पक्षांतर्गत वाद असतात, व्यक्तिगत मतभेद असू शकतात, परंतु विकासासाठी प्रश्न घेवून एकत्र येण्याची भूमिका बजावली पाहिजे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाला लक्ष केलं. ते म्हणाले की, शिवसेना संपवण्यासाठी भाजप सत्तेचा दुरुपयोग करून इडी , सीबीआय प्रमाणे निवडणूक आयोगाचाही दुरुपयोग करत आहे.