Uddhav Thackeray नागपूर : काँग्रेस असो अथवा भारतीय जनता पक्ष, यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेहरू यांच्या नावाने राजकारण बंद करावं. कारण आताचा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतो आहे. त्यांनी आपल्या काळात जे करायचं होतं ते करून गेलेत. मात्र आता तुम्ही काय करत आहात? हे पाहणं महत्वाचे आहे. अगदी पंतप्रधान मोदींनी देखील नेहरूंच्या नावे रडगाणे बंद करावे आणि काँग्रेसने सावरकरांच्या नावाने बोलणे बंद करावे. असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष काँग्रेसला आणि भाजपसह पंतप्रधानांना दिला आहे. 


मित्रपक्ष काँग्रेस उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकणार का? 


काँग्रेसने सावरकर आणि भाजपने नेहरूंबद्दल बोलणे सोडायला हवे, मोदींनी नेहरू यांचे रडगाणे बंद करावी, तर  काँग्रेसने सावरकरांवर बोलणे सोडावे. मुळात भाजपने सावरकर यांना भारत रत्न का जाहीर केला नाही? फडणवीस यांना अनेक वेळा पत्र दिले, मग अजून मान्यता का मिळाली नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आपापल्या जागी आहेत. आता आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवलं पाहिजे. मुळात सावरकरांना भारतीय जनता पक्ष भारतरत्न का देत नाही? त्यांची हरकत काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळेस उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Maharashtra Assembly Winter Session 2024) नागपुरात हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते बोलत होते. 


आम्हाला भूतकाळातल्या घटनेवर बोलायचे नाही- नाना पटोले 


दरम्यान, सावरकरांवरून उद्धव ठाकरेंनी मित्रपक्ष काँग्रेसला दिलेल्या सल्लावर काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता ते म्हणाली की,  सध्या वर्तमानच धोक्यात आहे. त्यामुळे आम्हाला भूतकाळातल्या घटनेवर बोलायचे नाही. आमच्यासाठी परभणी, बीड, शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जो सल्ला दिला त्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. असे म्हणत नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले आहे. 


या सरकारची झाली आहे दैना


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. तर  "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना", असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटले, अनेक आमदारांचे कोट घट्ट झाले आहेत. या सरकारची झाली आहे दैना, त्यामुळे तिकडे चैना वगैरे नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.  


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....