Uddhav Thackeray on Pm Narendra Modi: 'जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा माझ्या वडिलांनी आज जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवलं होतं.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या अडचणीच्या काळाची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपची (BJP) जेव्हा युती झाली, तो काळ आठवला तर देशाच्या राजकारण आम्हाला वाळीत टाकल्यासारखं होत, कोणीही आम्हाला सात देण्यास तयार नव्हतं. हात मिळवणं तर सोडा शेजारी येऊन बसण्याचीही कोणी हिम्मत करत नव्हता. कारण ते सांप्रदायिक आहेत. त्यावेळी जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा माझ्या वडिलांनी (balasaheb thackeray) आज जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवलं होतं. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. ते म्हणाले होते, राजधर्माचं पालन केलेच पाहिजे. जर त्यांनी राजधर्माचे पालन केलं असतं, तर आज जे तिथे (पंतप्रधान मोदी) बसले आहेत, ते तिथे बसले नसते. त्यावेळी बाळासाहेबांनी पर्वा केली नाही. त्यावेळी ती काळाची गरज होती.'' आज गोरेगाव येथे आयोजित उत्तर भारतीय मेळाव्याला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. 


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ''मला बाळासाहेबांचं कोणतंही एक वाक्य किंवा एक शब्द ही काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच, हिंदी भाषिक लोकांचा द्वेष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्वेष करा, ते असं कधीही म्हणाले नाही. जे आपल्या देशाच्या विरोधात आहेत, ते कुठल्याही धर्माचे असू द्या, तो जरी हिंदूही असला तरी देशविरोधी काम करत असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे बाळासाहेबांचे विचार होते आणि हेच आमचं हिंदुत्व आहे.''


'भाजप म्हणजे हिंदुत्व नाही'


भाजप-सेने युतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ''आम्ही युती तोडली, कारण 2014 मध्ये त्यांनी आधी युती तोडली. तेव्हाही आम्ही हिंदू होतो. आजही आम्ही हिंदू आहोत, उद्याही राहू. आम्ही फक्त त्यांची साथ सोडली आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. ते जे आज हिंदुत्व चालवत आहेत, ते मी मानायला तयार नाही.'' राज्यचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खिल्ली उडवत ते म्हणाले आहेत की, आम्ही आज तुमच्या इथे आलोय, तिथे कुरियरने पार्सल पाठवलं.