Uddhav Thackeray : फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कोणी जोशी की माशी घाटकोपरमध्ये बोलले होते, आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे, असे करून दाखवा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आम्ही प्रेमाने सगळे ऐकू. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते. पण, ती 57 वर्ष तरुण ठेवणे हे सोपे नाही. दत्ताजी यांची आठवण करणे गरजेचे आहे. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राने लढवून मिळवली. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. आम्ही दादरला राहत होतो आणि मी लहान होतो. घरी बेल वाजली, दरवाजावर दत्ताजी होते आणि ते म्हणाले मी शिवसेनेत प्रवेश केला आणि नोकरी सोडून आलोय. मी दत्ताजी यांनी साकारलेले संभाजीचे पात्र पाहिले आहे. नाटकात बेबंदशाहीमध्ये त्यांनी शिवसेना आणि कामगार सेना बांधली.
कामगार सेना शिवसेनेसोबतच असेल
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अरविंदला मी बोललो, राजीनामा द्यावा लागेल. तो बोलला येस सर आणि राजीनामा दिला. केंद्रातला मंत्री राजीनामा देतोय. पण, अरविंदला थांबविण्याचे काम केले नाही. कारण त्यांना कामगारांचे बिल पास करायचे होते. ते केले पण मी मुख्यमंत्री झालो आणि थांबविले तर यांनी माझे सरकार पाडले. प्रत्येक विभागात तुम्ही कामगार सेना वाढवायची म्हणत आहे, ते करा. पण, त्यांनी जर वेगळी चूल बनवायचे ठरविले तर ते मी होऊ देणार नाही. कामगार सेना ही शिवसेनेसोबतच असेल. कामगार सेनेचे ऑफिस वेगळे खोला. पण, तुम्हाला आठवड्यातून एकदा शाखेत जावे लागेल.
ही कुठेही एडजस्टमेंट सेना नाही
काही लोक कामगार सेनेत असतात आणि बाहेर पडले तर दुसऱ्या पक्षाचे काम करतात. ज्यांना कामगार कायदे कळतात त्यांनाच पद द्या. तुमच्यात किती जण आहे ज्यांना आजपर्यंत मी काही दिले नाही तरी शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठी ते काम करत आहेत. ही कुठेही एडजस्टमेंट सेना नाही. सगळ्यांचा मान राखून नेमणुका करा. तुम्ही माझा जयघोष करतात. माझ्या खुर्चीवर बसून बघा नेमणुका करताना काय होते? वक्फ बोर्डवर तुम्ही गैर मुस्लिम माणूस टाकत असाल तर आमच्या हिंदू मंदिरांवर तुम्ही गैरहिंदू ठेवणार का? वक्फ बोर्ड, मराठी भाषेवरून आपल्यात भांडण लावले. आम्ही मराठी बोलणारे तुमच्यावरून कडवट हिंदू आहोत. पण आपल्याला गुरफटून ठेवले जात आहे. आपल्याला भांडणात गुंतवून यांचे काय चालू आहे बघा. ठाण्यात एका बिल्डरसाठी क्लस्टरचे काम सुरू आहे. अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.
फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा मतदान करीन. आम्ही प्रेमाने सगळे ऐकू. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू. हिंदीची सक्ती कशासाठी? मला अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्ती करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना केला आहे. हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही. काही नतदृष्ट याविरुद्ध कोर्टात गेले. आपले सरकार गद्दारी करून पाडले. एसंशिने पाडले आणि आता पाय चाटत आहेत. मी सांगतोय इस राज्य मैं रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना होगा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कोणी आले होते ना जोशी की माशी... ते घाटकोपरमध्ये बोलले होते, आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
आणखी वाचा