नागपूर : राज्यातील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नसल्याने महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोधी पक्षनेतेपदावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. जर विरोधी पक्षनेतेपद द्यायचे नसेल तर उपमुख्यमंत्रीपदाची देखील संविधानात तरतूद नाही, त्यामुळे ती दोन्ही पदंही रद्द करा असे म्हटले. आता, उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील (Delhi) आम आदमी पक्षाच्या सरकारचं उदाहरण देत, भाजपकडे केवळ 3 सदस्यसंख्या असतानाही दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यात आलं होतं, त्यामुळे महाराष्ट्राती विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायलाच हवी, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदावरुन विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेतेपदाची निवड होण्याची मागणी केली. तत्पूर्वी, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणी जागवल्या. शिवराज पाटील सुसंकृत, सभ्य व्यक्तिमत्व होतं. त्यावेळी, शिवसेना आणि काँग्रेस विरोधात लढले तरी त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. मुंबईत 26/11 चा हल्ला झाल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता, आत्ताच्या काळात अशी नैतिकता दिसत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
दरम्यान,दिल्लीच्या विधानसभेत 70 पैकी केवळ 3 जागा भाजपने जिंकल्या असतानाही आम आदमी पक्षाने भाजपला विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्यावेळी संख्याबळ नसताना सुद्धा भाजपने ते स्वीकारलं होतं, असा राजकीय इतिहासही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितला. तसेच, विरोधी पक्षाचे नाव तुम्ही नाही ठरवायचं, भाषण काय करायचं ते मी ठरवतो, असेही ठाकरेंनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट
दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही, हे इतिहासमध्ये पहिल्यांदाच होत आहे. आम्ही भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र दिले होते, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री म्हणाले हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाआहे. त्यामुळे, आम्ही अध्यक्षांकडे मागणी केली आहे, त्यासोबतच विधानपरिष सभापती यांनासुद्धा भेटलो. त्यावर, आम्ही लवकरच निर्णय घेऊ, आमच्या विचारात हा निर्णय आहे, असे त्यांनी सांगितलं. आमचा म्हणणं आहे की, दोन्ही सभागृहाला या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद मिळावं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
वेगळा विदर्भ होऊ शकत नाही
शिंदेंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू शकत नाही, काय बोलतात त्यांना लक्षात राहत नाही. विदर्भाच्या मुद्द्यावर किती चर्चा झाली? वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ महाराष्ट्राचा वेगळा भाग नाही, तो महाराष्ट्राचा भाग आहे, कुणीही विदर्भाला वेगळं करू शकत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.