नागपूर : राज्याच्या राजकारणातील विरोधक आणि नेहमीच एकमेकांवर टीका करणाऱ्या कोकणातील दोन नेत्यांची आज विधानसभेत जुगलबंदी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहात मच्छिमारांच्या प्रश्नावरुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर, उत्तर देताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंनाही मध्ये खेचले. दोन्ही विरोधकांची ही जुगलबंदी विधिमंडळात चर्चेत असून आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भरसभागृहात भास्कर जाधव यांना मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, नितेश राणे यांनी भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांचं कौतुक करत, तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणला आणि मच्छिमारांना होईल, असे म्हणत त्यांची सूचना मान्य केली. 

Continues below advertisement

राज्य सरकारने सिल्व्हर पापलेट हा राज्यमासा म्हणून घोषित केला आहे, अशी माहिती देत नितेश राणेंनी सभागृहात निवेदन केलं. त्यानंतर, भास्कर जाधव यांनी विधानसभेत पापलेट माशाचा मुद्दा उपस्थित केला. मी मंत्री असताना, माथाडी कामगारांच्या धर्तीवर आपण मच्छिमारांसाठी बोर्ड स्थापन केलं होतं. पण, अद्याप मच्छीमार बोर्डाची मुंबईमध्ये कुठेही जागा नाही, मच्छिमार एकदा समुद्रात गेले की आठ दहा दिवस आतमध्ये असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या बोर्डाच्या माध्यमातून निधी मिळावा, त्यांचा विकास व्हावा. यासाठी, कोकणातील मंत्री म्हणून आपण मच्छीमार बोर्डाची माहिती घ्या, गरज लागली तर माझी मदत घ्या. पण, या बोर्डाचे पुनरुज्जीवन करावे अशी सूचना भास्कर जाधव यांनी मंत्री नितेश राणेंना केली होती. त्यावर, उत्तर देताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. 

आदित्य ठाकरेंकडून भास्कर जाधवांना सभागृहात जादू की झप्पी

भास्कर जाधव हे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांच्या नेहमीच चांगल्या सूचना असतात. मी त्यांच्या सूचना ऐकत असतो, त्यांना वाटतं मी ऐकत नाही. पण, त्यांचाही टोन आदित्य ठाकरे बाजुला असल्यावर वेगळा असतो आणि नसले तर वेगळा असतो. आता, आदित्यजी बाजूला आहेत म्हणून काल थोडी चिडचीड झाली, पण कुठे वैयक्तिक भेटल्यावर मिठीही मारतात, अशी कोपरखळी नितेश राणे यांनी सभागृहात मारली. याचवेळी भास्कर जाधवांच्या शेजारी असलेल्या आदित्य ठाकरे यांनी उभे राहून भास्कर जाधव यांना मिठी मारली, त्यामुळे सभागृहात हशा पिकला. नितेश राणेंनीही हसून दाद दिली. तसेच, मी आपल्यासमोरच ही मिटींग लावेल, कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला पाहिजे, कोकणाला पाहिजे आणि मच्छिमारांनाही पाहिजे, असे नितेश राणेंनी म्हटले. 

Continues below advertisement

हेही वाचा

मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं