Uddhav Thackeray Speech : एकीकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह हातातून गेलं तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील लढाई, अशा विविध आघाड्यांवर सामोरं जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या राज्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर (Uddhav Thackeray Konkan Visit) जाणार आहेत. या दौऱ्याविषयी त्यांनी आज (22 फेब्रुवारी) मातोश्रीवर (Matoshree) कार्यकर्त्यांना संबोधित केलं. खेडमध्ये पाच मार्च रोजी मैदान अपुरे पडायला हवे, एवढी गर्दी सभेला करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.


उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना तीन अटी...


यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तीन प्रश्न विचारले. ते म्हणाले की, आज मी तुम्हा दोन चार अटी घालणार आहे. पहिली अट म्हणजे खेड हा आपला मतदारसंघ आहे, तो आपलाच राहयला हवा. दुसरी अट अशी इथल्या इच्छुकांची तयारी झाली आहे का? आणि तिसरी अट म्हणजे पाच तारखेला मैदान अपुरं पडले एवढी गर्दी करा. यावर कार्यकर्त्यांनी हो असं एकमताने उत्तर दिलं.


'मैदान अपुरे पडायला हवे, एवढी गर्दी सभेला करा'


दरम्यान शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांची 5 मार्च रोजी खेड तालुक्यात जाहीर सभा होणार आहे. खेडमध्ये पाच मार्च रोजी मैदान अपुरे पडायला हवे, एवढी गर्दी सभेला करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं. खेड हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, तो आपल्याकडेच राहिला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.


'प्रत्येकाने जबाबदारी घ्या...'


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "सभेच्या दुसऱ्या दिवशी शिमगा आहे, त्यांचा शिमगा रोजचाच आहे. त्यांना बोंबलायला लावू. तुमचा उत्साह दांडगा आहे. या सभेकडे पूर्ण देशाचं लक्ष असणार आहे, कारण पहिली सभा आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घ्या. सर्वसामान्य लोक मैदानात येणार आहेत." "दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर कांदा भाकरी घेऊन शिवसैनिक आले होते, ही आपली ताकद आहे. राहिलेला कांदा त्यांच्या नाकाला लावूया," असा टोलाही त्यांनी लगावला.


नाव, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा 5 मार्चला पहिल्यांदा कोकण दौरा


उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. 5 मार्च रोजी रत्नागिरी जिह्यातील खेडमध्ये होळी मैदान इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी कोकणातील काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेशही करणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे कोकणातील जनतेचे लक्ष लागलं आहे.