मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार खासदार अनिल देसाई यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून राहुल शेवाळे यांचा पराभव केला होता.
खासदार अनिल देसाई यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अॅड. महेंद्र भिंगारदिवे यांनी देसाई यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी ही निवडणूक याचिका फेटाळून लावली.यामुळं अनिल देसाई यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अॅड. महेंद्र भिंगारदिवे यांनी राईट टू रिकॉल पार्टी च्यावतीनं निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यांनी अनिल देसाई यांच्या उमेदवारीला आणि त्यांच्या उमेदवारीच्या कागदपत्रांना आव्हान दिलं होतं. अनिल देसाई यांची उमेदवारी अवैध ठरवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. देसाईंच्या अर्जातील काही रकाने रिक्त होते तर काही ठिकाणी स्टँम्प पेपरच्या मागील बाजूस स्वाक्षरी नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. अनिल देसाईंच्या शपथपत्रात अपुरी माहिती असल्याचं देखील ते म्हणाले होते. ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्यानंतर खासदार अनिल देसाई यांनी संबंधित निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी याचिका दाखल केली होती.
अनिल देसाई यांच्यावतीनं देवदत्त कामत आणि अंकित लोहिया यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक याचिका फेटाळण्यात आली.
राहुल शेवाळे यांचा पराभव करत अनिल देसाई लोकसभेत
लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी अनिल देसाई हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार होते. राज्यसभेची टर्म संपल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीची एकजूट अनिल देसाई यांना या मतदारसंघात फायदेशीर ठरली. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांना पराभूत करत विजय मिळवला. अनिल देसाई यांना या लोकसभा मतदारसंघात 395138 मतं मिळाली होती. तर, राहुल शेवाळे यांना 341754 मतं मिळाली होती. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा 53384 मतांनी पराभव केला होता. तर, याचिकाकर्ते अॅड. महेंद्र भिंगारदिवे यांना 1444 मतं मिळाली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. मुंबईत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दीना पाटील हे तीन खासदार विजयी झाले होते.
इतर बातम्या :