मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी काँग्रेसने (Congress) उमेदवार न दिल्याने किंवा इतर कुठल्याही पक्षाने दहावा उमेदवार न दिल्याने अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी, AB फॉर्म देखील दिल्लीतून पाठवला होता. मात्र, अखेर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) दिल्लीत हायकमांडशी फोनवरून बोलणं केल्यानंतर ही कोंडी सुटली आणि काँग्रेसने माघार घेतली.

Continues below advertisement

विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास चारवेळा फोनवरून बोलणं झालं होतं. तर उद्धव ठाकरे यांचंही काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत तीन ते चार वेळा फोनवरून बोलणं झालं. पुढील राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या प्रस्तावावर एकमत होत नसल्याने थेट उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते फोनवरून चर्चेत सहभागी झाले होते. त्यानंतर, दिल्लीकरांशी झालेल्या चर्चेअंती काँग्रेसने काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात बोलताना काँग्रेस उमेदवार देणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर, काहीवेळातच हा निर्णय झाला. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी दिल्लीत फोनवरून बोलणं केल्यामुळेच काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांना मान्य केल्याचं दिसून येत आहे. 

काँग्रेसची मविआसमोर नेमकी कोणती अट?  

दरम्यान, काँग्रेसने अंबादास दानवे यांना कोणत्या मुद्यावर पाठिंबा दिला? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. तर विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

विधानपरिषदेसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र विधान परिषदेच्या होत असलेल्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात प्रमुख राजकीय पक्षांच्या नऊ उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत तर अपक्ष उमेदवार असलेल्या चौघांनी प्रत्येकी एक असे एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे आणि संबंधित उमेदवारांच्या अर्जावर सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या नसल्यामुळे हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. पर्यायाने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असून याची औपचारिक घोषणा सोमवारी होईल..

हेही वाचा

राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान