Laxman Hake on Uddhav Thackeray and Sharad Pawar, सोलापूर : "उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून ओबीसींचा विश्वास गमावला. ओबीसी प्रश्नावर ठाम भूमिका ते घेत नाहीत.  स्वर्गीय बाळासाहेबांचे पुत्र म्हणून आजवर समाजाची तुम्हाला सहानुभूती होती. मात्र जोपर्यंत तुम्ही शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसाल, तोपर्यंत ओबीसी  उद्धव ठाकरे यांच्याकडे संशयाने पाहत राहील", अशी टीका ओबीसी नेते प्राध्यापाक लक्ष्मण हाके यांनी केली. मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे आज  बंजारा समाजाच्या सीतामाता यात्रेसाठी आले असता हाके बोलत होते. यावेळी बंजारा आणि ओबीसी समाजाने हाके यांचे जोरदार स्वागत केले. पारंपरिक वेशातील बंजारा भगिनींच्या सोबत हाके यांनी बंजारा नृत्यावर ठेकाही धरला. 


शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्रित करून स्वराज्य उभे केले होते


लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार कसले जाणते राजे असा सवालही लक्षण हाके यांनी केला.  छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्रित करून स्वराज्य उभे केले होते. मात्र शरद पवार कधी पोहरादेवीला संत सेवालाल यांच्या भेटीला आले असते तर त्यांना बंजारा समाज समजाला असता. आरेवाडीच्या बिरोबाला गेले असते तर त्यांना मेंढपाळ समाज दिसला असता. ते कधी भगवानगडावर गेले असते तर त्यांना वंजारी समाज दिसला असता. ते कधी जेजुरी किंवा माळेवाडीच्या खंडोबाला  गेले असते तर त्यांना इथला अलुतेदार , बलुतेदार यांची परिस्थिती समजली असती. महाराष्ट्रात 50 ते 60 टक्के राहणार ओबीसी हे खरे महाराष्ट्राचे खरे स्वरूप असल्याचे हाके यांनी सांगितले.


वतनदार निर्माण करून चोरांच्या दरोडेखोरांच्या टोळीचे नेतृत्व करणे


पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार यांना या समाजाचे कोणतेही सोयर सुतक नसून निवडणूक जिंकणे , कारखाने काढणे. पाहुण्यांना आमदार, खासदार, मंत्री करणे , त्यांना कारखाने वाटणे आणि शेवटी हे वतनदार निर्माण करून चोरांच्या दरोडेखोरांच्या टोळीचे नेतृत्व करणे. या पलीकडे शरद पवारांनी काय केले? असा सवालही हाके यांनी केला. 


हे शरद पवार आता मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करताना त्यांना महात्मा म्हणू लागलेत. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा 29 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार आहेत. जरांगे यांनी आता उपोषण करुदे  किंवा कोणतीही आदळआपट करू दे , ते मागतात ते त्यांना कधीच मिळणार नाही.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना मजबूत असल्याचा टोलाही हाके यांनी लगावला.