मुंबई: राज्यात आज पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. राज्यात मतदान पार पडत असलेल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. यापैकी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत चुरशीची मानली जात आहे. ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या अंगणातील मतदारसंघ म्हणून उत्तर मध्य मुंबईची (North Central Mumbai Lok Sabha) ओळख आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी सोमवारी सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.


उत्तर मध्य मुंबईतील मतदानाची यंदाची विशेष गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले आहे. आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार उभा राहत असल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला कधीच मतदान केले नव्हेत. परंतु, यंदा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. जागावाटपात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर शिक्का मारला. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले? 


उद्धव ठाकरे वांद्र येथील कलानगर परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान करुन बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, देशातील लोक जुमलेबाजीला कंटाळले आहेत. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी ते मतदान करतील. जुमलेबाजांनी प्रचंड पैसा वाटला आहे. मात्र, मतदान पैशांचा पाऊस स्वीकारणार नाहीत. पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


 



आदित्य ठाकरे मतदानानंतर काय म्हणाले?


आम्ही देशासाठी मतदान केले आहे, संविधान रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केले आहे. तुम्हीही मतदान करा, हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा आहेत, मतदार बाहेर येतील आणि मतदान करतील. काही ठिकाणी मतदार यादीत गोंधळ दिसतोय, ऊन आहे, सावलीसाठी मंडप वगैरेची सोय करायला हवी. निवडणूक आयोगाने तयारी करायला हवी होती, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.


आणखी वाचा


Live Updates: महाराष्ट्रातील मतदानाचे लाईव्ह अपडेटस् वाचण्यासाठी क्लिक करा