Uddhav Thackeay on Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी 'जय गुजरात', अशी घोषणा दिली होती. मराठीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापले असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या वक्तव्यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात समाचार घेतला जाणार, असा अंदाज होता. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला नाही. परंतु, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचा यथोचित समाचार घेतला. 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता म्हटले की, काल एक गद्दार 'जय गुजरात' बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, 'झुकेगा नय साला'. पण आपले गद्दार म्हणतात, 'कुछ बी बोलो, उठेगा नही साला'. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक सू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. आपण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी आपले डोळे उघडण्याची वेळ येणार नाही. आता आलेली जाग जाणार असेल तर भविष्यात स्वत:ला मराठी आईची मुलं बोलू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत भाष्य केले. आम्ही आता एकत्र  आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray & Raj Thackeray: उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, कोणावरही अन्याय करु नका. पण कोणी अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. फडणवीसांचे सगळे चेलेचपाटे हेच म्हणतात. पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का? इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरुन टाकतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

आमच्या दोघांतील 'अंतरपाट' अनाजीपंतांनी दूर केला; आता आम्ही दोघे मिळून फेकून देणार आहोत; राज साक्षीने उद्धव ठाकरेंचा मनसे निर्धार