मुंबई : राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलंच चर्चेत असून आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या लढाईत देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे. त्यानुसार आमदार धस हे याप्रकरणात आरोपींच्या शिक्षेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत, गृहमंत्र्यांना भेटून तपासाची माहिती देत आहेत. तसेच, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशीही संपर्कात असून फरार आरोपींच्या अटकेसाठी दबाव टाकत आहेत. मात्र, दुसरीकडे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकणावर भाष्य करताना, पोलिसांबद्दल त्यांची मवाळ भूमिका दिसून आली. नाशिक येथे लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत. त्यावरुन, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी संताप व्यक्त केलाय. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आमदार धस यांना चांगलंच सुनावलं आहे.
एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि परभणीमध्ये दुसरी भूमिका घ्यायची, हा माणूस दुटप्पीपणा करत असल्याचं दिसत आहे. सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करत आहेत, हे त्यातून दिसत आहे. दलित व्यक्तीचा खून होतो, तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाषा वापरली जाते. पण, जो दोषी असेल तो सुटता कामा नये, सुरेश धस यांना जातीचा स्पर्श, गर्व असल्याचा भास होत आहे. त्यांच्या या दुटप्प पणाचा मी निषेध करतो, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत, पोलिसांनी खून केलाय, कोणीही सुटता कामा नये, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. तर, सुर्यवंशी मारले गेले आहेत, सुरेश धस यांनी पांघरून घालू नये, अशा शब्दात आमदार धस यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
पंकजांनी पक्ष काढावा, आम्ही साथ देऊ
मी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याबरोबर काम केले आहे, पंकजा ताईंनी पुढाकार घ्यावा आणि स्वंतत्र पक्ष काढावा. आम्ही ओबीसी चळवळ काम करू, त्यांना साथ देऊ, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी त्यांचे वडिल दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सामर्थ्याबद्दल बोलताना, गोपीनाथ मुंडे स्वतंत्र पक्ष उभारतील एवढी त्यांची ताकद होती, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय.
सुरेश धसांवर अॅट्रॉसिटींतर्गत गुन्हा दाखल करावा
दरम्यान, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पोलिसांनी हत्या केली त्या पोलिसांना माफ करा, त्यांना एक संधी द्यावी, त्यांच्यावर गुन्हा नोंद करू नका, असे जाहीर चुकीचे वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले आहे. धस यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या भावना दुखावल्या आहेत, सुरेश धस यांच्यावर तात्काळ अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आमदार सुरेश धस यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही, असा इशाराही भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा
मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण