कोल्हापूर : राज्यातील महायुतीच सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तारीख अन् वेळ निश्चित झाल्यामुळे गुरुवारच्या सर्वच वर्तमानपत्रात भाजपकडून (BJP) शपथविधी सोहळ्याच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र आता थांबणार नाही... या मथळ्यासाठी सर्वांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भाजपच्या या जाहिरातीमधील महापुरुषांच्या फोटोंमध्ये राजर्षी शाहू महाराज (Shahu maharaj) यांचा फोटो छापण्यात न आल्याने ही जाहिरात वादाचा मुद्दा बनली. माजी खासदार संभाजीराजे यांनी, हे खपवून घेणार नाही, असे म्हणत भाजपला इशारा दिला. आता, खासदार शाहू महाराज यांनीही हे जाणीवपूर्वक केलेले षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, शपथविधी सोहळ्याची जाहिरात ही वादाच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारने जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो न छापणे हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे, असा थेट आरोप खासदार शाहू महाराज यांनी केला. सरकारच्या या कृत्याचे पडसाद कोल्हापूरसह राज्यभर उमटतील. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक येथे इंडिया आघाडीच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी, खासदार शाहू महाराज यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर जोरदार टीका केली. राजर्षी शाहू महाराजांचा फोटो न वापरून सरकारने घोडचूक केली आहे. राज्य सरकारकडून राजर्षी शाहूंचे विचार संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे हे षडयंत्र जनतेने हाणून पाडण्यासाठी लढाई हाती घेणे गरजेचे आहे, असेही शाहू महाराज यांनी म्हटले. त्यामुळे, आता राज्य सरकार या सगळ्या प्रकारावरून माफी मागणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरीकडे संभाजीराजेंनीही याच मुद्द्यावरुन भाजप महायुतीला सुनावलं होतं.
संभाजीराजेंचाही भाजपला इशारा
शपथविधी सोहळ्यासाठी जाहिरातीमध्ये महापुरुषांचे फोटो छापले. मात्र, शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा स्वराज पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील नेते आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच, हा महाराष्ट्र छत्रपती, शाहू, फुले अन् आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगतात. पण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीतूनच राजर्षी शाहू महाराजांचा फोटो वगळण्यात आल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.