Rajya Sabha नवी दिल्ली: दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या बेंचखाली नोटांची बंडल सापडल्याचे समोर आले होते. काल सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर तपासणीदरम्यान नोटा सापडल्याची माहिती समोर आली आहे. आज सभापतींनी याबाबत सभागृहाला अधिकृत माहिती दिली.
नेमकं प्रकरण काय?
जगदीप धनखड यांनी सदर प्रकरणाबाबत माहिती देताना म्हणाले की, काल (गुरुवारी 5 नोव्हेंबर) सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की, सीट क्रमांक 222 मधून रोख रक्कम सापडली आहे. ही जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार व्हायला हवा आणि तोही केला जात आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू काय म्हणाले?
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, नियमित प्रोटोकॉलनुसार, सुरक्षा पथकाने सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर सर्व तपासणी केली. त्या प्रक्रियेदरम्यान, नोटांची बंडलं सापडली. आपण डिजिटल इंडियाकडे जात असताना सभागृहात नोटांचे बंडल घेऊन जाणे योग्य आहे का? आम्ही घरामध्ये नोटांचे बंडल ठेवत नाही, मी अध्यक्षांच्या निरीक्षणाशी पूर्णपणे सहमत आहे. या प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे.
काल राज्यसभेत जाताना माझ्याकडे केवळ 500 रूपये होते- अभिषेक मनू सिंघवी
काल राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. तसेच मी राज्यसभेत फक्त तीन मिनिटं बसलो होतो, असं स्पष्टीकरण अभिषेक मनू सिंघवी यांनी दिले.