अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघामध्ये घडलेल्या प्रकारावरुन राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल विखे पाटील यांचे समर्थक असलेल्या वसंतराव देशमुख यांनी गलिच्छ व बेताल व्यक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी, थोरात समर्थकांनी जाळपोळ व गाड्यांची तोडफोड केल्याचीही घटना घडली आहे. त्यावरुन,आता राजकीय वातावरण तापलं असून थोरात व विखे पाटील कुटुंब आमने सामने आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व सुजय विखे यांचे वडिल राधाकृष्ण विखे पाटील यांनी घडलेल्या घटनेवरुन प्रतिसवाल केला आहे. सुजय विखेंच्या (Sujay Vikhepatil) सभेत जे वक्तव्य झालं त्याबद्दल आम्ही स्पष्टीकरण दिलय. वसंतराव देशमुखांनी जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध केलाय. माझ्या आणि सुजयच्या सार्वजनिक जीवनात आम्ही कधीही अशी वक्तव्य केली नाही, देशमुख यांना अटक करावी हीच मागणी आम्ही केली होती. मात्र वसंत देशमुख हे भाजपचे नाही तर काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते, काँग्रेसनेच त्यांच्यावर कारवाई करावी, असे विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, सुजय विखेंवरच प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी म्हटलं. 


जयश्री ताईबद्दल आम्ही काहीच बोललो नाही, त्या स्वतःला या प्रकरणात का ओढाऊन घेताय? तुम्ही या भानगडीत येऊ नका. तुमच्या पिताश्रींचा दहशतवाद समोर आलाय, वसंत देशमुख तेथील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते म्हणजे ते आमचे होत नाहीत, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जयश्री थोरात यांनाच सुनावलं. तसेच, जयश्री ताई फार छोट्या आहेत, त्यांना अजून फार शिकायचं आहे. सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?, असा सवालही विखे पाटील यांनी विचारला आहे. 


देशमुखांच्या वक्तव्यामागे राजकीय षडयंत्राचा भाग


वसंतराव देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्राचा भाग वाटतोय, अर्ध्यातासात थोरातांचे गुंड गोळा झाले. थोरातांचा पीए, त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात यांच्या गाडीत काठ्या कुऱ्हाडी होत्या, त्यांना डॉ.सुजय वरच प्राणघातक हल्ला करायचा होता. संगमनेर तालुक्यात सुजयची लोकप्रियता वाढली आहे, त्यांच्या बालेकिल्ल्यात सुजयच्या उच्चांकी सभा होत आहेत. त्यामुळे,  थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील जाळपोळीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.  इतक्या वर्षे थोरात यांनी दहशत माजवून निवडणुका जिंकल्या,  एकीकडे स्वतःला सुसंस्कृत म्हणता आणि दुसरीकडे राजकीय दहशतवाद सुरू आहे. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुनियोजित होती. महिला आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली, याची चौकशी व्हायलाच पाहिजे, याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तुम्हीच तोडफोड आणि जाळपोळ करता आणि पोलिस स्टेशनला जाऊन आंदोलन करता. चोराच्या उलटया बोंबा सुरू पोलिस प्रशासनावर माझा विश्वास, आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे, सत्य समोर आलेच पाहिजे असेही विखे पाटील यांनी म्हटले. 


हेही वाचा


भावाची भावकी झाली, लेकासाठी बाप उतरला मैदानात; श्रीनिवास पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ