मुंबई : राज्याच्या राजकारणात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एकत्रिकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यादरम्यान आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये युतीबाबत कोणती चर्चा झाली का? याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकत्रिकरणाबाबत काही चर्चा झाली का? याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, अजिबात या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. फक्त नागरिकांच्या मुद्यावर बोलले.
दरवेळी पावसाळा सुरू झाला की नागरिकांनी काय काळजी घ्यावी. लोकांशी संपर्कात राहा. कोणाला काही अडचण आहे का बघा. डेंग्यू मलेरिया काही झाला आहे का? रूग्णांची संख्या वाढली आहे का? ते तपासा याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. याशिवाय मतदारांच्या याद्या तपासा काय आहे ते आढावा घ्या, लोकांच्या समस्या समजावून घ्या. अशा सूचना दिल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं आहे. दोन्ही पक्ष एकत्रित येण्याबाबत दोन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
नितेश राणेंना किशोरी पेडणेकरांचा सल्ला
नितेश राणेंच्या "सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा जोरदार भडिमार केला आहे. "कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत."मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीकडून सातत्याने सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने विरोधक त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली असून, "नितेशने जपून बोलावे," असा सूचक सल्ला त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेडणेकर म्हणाल्या, नितेश राणे यांनी खरंच सांभाळून बोलले पाहीजे. सत्तेत घेतलेले मांडीवर बसविलेले जे पक्ष आहे त्यांच्याबाबत तरी असे बोलू नका. आम्ही विरोधी पक्ष त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. पण किमान सोबत घेतलेल्या लोकांबद्दल तर बोलू नका? असंही पुढे किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.