Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या (MNS-Shivsena UBT Yuti) चर्चांनी जोर धरला आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अद्याप प्रत्यक्ष संवाद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नातेवाईकांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात संवाद सुरू आहे. मागील दोन महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या संदर्भात चर्चा सुरू आहेत. मात्र अजूनही कुठलाही प्रस्ताव किंवा युतीबाबत थेट चर्चा दोन्ही भावांमध्ये झालेली नसल्याचं सूत्रांची माहिती आहे.
ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी राज-उद्धव एकत्र येणार?
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके सुरू आहेत. आज मनसेच्या केंद्रीय समितीची पुन्हा बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकानंतर पुन्हा एकदा 2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसेप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील ही चर्चा रंगली आहे. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे. सोबत दोन्ही नेत्यांच्या मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासंदर्भात माध्यमांवर चर्चा केली. मात्र प्रत्यक्षात दोनही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केली आहे.
राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे.