Thackeray Vs Shinde : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचे (Shiv Sena) दोन्हीही गट पूर्णपणे तयार आहेत. याच दसरा मेळाव्याच्या निमित्याने दोन्हीही गट शक्तिप्रदर्शन करणार असून आम्हीच खरी शिवसेना आहोत, हे दाखवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. आता यात दसरा मेळाव्याच्या निमित्त शिंदे गट (Shinde Group) हा ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्के देण्याची शक्यता आहे. कारण दसरा मेळाव्याला (Dasara Melava) ठाकरे गटातील काही मोठे नेते, कार्यकारणी सदस्य, आमदार, खासदार शिंदे गटाच्या गळाला जाऊ शकतात. त्यामुळे शक्तिप्रदर्शनासोबत हा धक्का देण्याची तयारी सुद्धा शिंदे गटाने केली असल्याची माहिती आहे.


शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी एकीकडे बीकेसी तर दुसरीकडे शिवाजी पार्क हे दोन्ही मैदान तयार होत आहेत. लाखोंच्या संख्येने राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्ते एकत्र येतील अशी तयारी दोन्ही गटाकडून केली जात आहे. यातच शिंदे गट आपली ताकद दाखवण्यासाठी किंबहुना वाढवण्यासाठी ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सध्या ठाकरे गटात असलेले नेते पदाधिकारी हे दसरा मेळाव्याला शिंदे गटासोबत पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.


आतापर्यंत आपण शिंदे गटाची ताकद पाहिली आहे. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार त्यासोबतच माजी आमदार, खासदार आणि सेनेचे मोठे नेते हे शिंदे गटासोबत आहेत. आता सगळे आमदार, खासदार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर असतील आणि त्यातच दसरा मेळाव्याचे निमित्त साधत यात आणखी भर पाडण्यासाठी शिंदे गट पूर्णपणे प्रयत्न करुन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल.


शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सध्या ठाकरे गटात असलेले कोण कोण शिंदे गटात सामील होऊ शकतात?


* कार्यकारणी सदस्य
* काही आमदार,खासदार
* काही माजी आमदार,खासदार
* नगरसेवक
* पदाधिकारी


खरी शिवसेना कोणाची? याची लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे तिथे आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याची तयारी दोन्ही गटाकडून केली जात आहे. त्यासाठीच अधिकाधिक नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते हे आपल्या बाजूने कसे राहतील किंवा कसे वळतील याचाच प्रयत्न दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केला जाणार आहे. याची चित्रफीत सुद्धा निवडणूक आयोगासमोर दाखवली जाऊ शकते.


एकीकडे शिवसेना ठाकरे गट आपल्या कार्यकर्त्यांचे शपथपत्रे लिहून घेऊन गठ्ठेच्या गठ्ठे जमा करत आहे तर दुसरीकडे याच शिवसेना ठाकरे गटाला अधिकाधिक आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न शिंदे गट करत आहे. आता अधिकाधिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या बाजूने ठेवण्यात कोण यशस्वी होतं आणि  खरी शिवसेना असल्याचा कोणाचा दावा खरा ठरतो हे निवडणूक आयोगच ठरवेल.


दसरा मेळावा दोन्ही गटासाठी निमित्त आहे खरी शिवसेना आम्हीच आहोत हे दाखवण्याची, आपली ताकद वाढवण्याची. खरी शिवसेना कोण याचा निर्णय जरी निवडणूक आयोग लवकरच करणार असला तरी आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना एकनिष्ठ ठेवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे तर दुसरीकडे आपली ताकद अधिक वाढवण्याचं काम शिंदे गटाकडून केलं जाणार आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला ठाकरे गटाला धक्के देण्याचा प्रयत्न शिंदे गट यशस्वी करुन दाखवणार का, हे 5 तारखेला दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरच कळेल.