पुणे : राज्याचे माजी मंत्री व शिवसेना पक्षाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होती. विशेष म्हणजे ऋषीराज सावंत यांना ड्रायव्हरने एअरपोर्टजवळ सोडल्यामुळे नंतर ते कुठे गेले याची कोणालाही माहिती नसल्याने गोंधळ उडाला. त्यातच, पुणे (Pune) पोलीस कंट्रोल रुमला ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा फोन गेल्यामुळे पोलिसांत गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. आता,बँकाँकला निघालेले ऋषीराज सावंत हे चेन्नईत आपलं विमान थांबवून पुण्यात परतले आहेत. त्यानंतर, पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा आणि आमदार तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली. त्यावेळी, याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याने ऋषीराज सावंत यांची प्राथमिक चौकशी केली जाणार असून त्यांचा बँकाँकसाठीचा पुणे ते चेन्नई प्रवास जाणून घेतला जाईल, असे शर्मा यांनी म्हटले.
पुढे बोलताना पोलीस सहआयुक्त शर्मा म्हणाले की, आज सायंकाळी 4 वाजता पुणे पोलिसांना कॉल आला ऋतुराज सावंत सावंत यांना अज्ञात व्यक्ती घेऊन गेला आहे. मात्र, माहिती घेतल्यानंतर समजलं की ते एका खाजगी विमानाने बँकॉकला निघाले होते. पण, याबाबत त्यांनी घरी सांगितलं नव्हतं. विमानातून जाणारे ते तिघे होते, ऋतुराजसोबत त्याचे आणखी 2 मित्र असल्याचे माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. याप्रकरणी, आमच्याकडे अपहरणाचा गुन्हा दाखल होता, त्यानुसार आता ते पुण्यात परत आल्यानंतर त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. गुन्हा दाखल असल्याने त्यांची प्राथमिक चौकशी केली जाईल, असेही शर्मा यांनी माजी मंत्री व ऋषीराज सावंत यांचे वडिल तानाजी सावंत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
दरम्यान, पोलीस कंट्रोलला फोन आला होता, त्यामुळे पटकन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे, विचारपूस केल्याशिवाय अधिक बोलणं योग्य नाही. याबाबत पोलिसात फिर्याद दाखल झाली होती. त्यानुसार, आता पुण्यात आल्यानंतर ऋषीराज सावंत यांची प्राथमिक चौकशी करण्यात येईल. नेमकं कुठं गेले होते, जाण्याचे कारण काय होते, कोण-कोण सोबत होते याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाील.
काय म्हणाले तानाजी सावंत
मुलगा कोणालाही न सांगता गेला होता. तो एअरपोर्टला गेला आहे, असं ड्रायव्हरने सांगितलं. आमच्यात कुठले देखील वाद नाहीत, तो न सांगता गेला कसा? याबाबत माहिती नाही. अचानक त्यांचं ठरलं का? याबाबत माहिती नाही. मला ड्राइवरने सांगितलं. त्यावेळी, एक बाप म्हणून भीती वाटल्याने काळजीपोटी धावाधावे केल्याचं आमदार तानाजी सावंत यांनी सांगितले.