Monsoon Session: लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर आता लोकसभेचे कामकाज उद्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.


सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यापूर्वी सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनी गोंधळ घालत असलेल्या काँग्रेसच्या चार खासदारांची नावे घेतली. यानंतर नियम 374 अन्वये काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.


तत्पूर्वी विरोधी पक्षातील खासदारांनी सोमवारी सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत झालेली वाढ या मुद्द्यांवर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. ओम बिर्ला म्हणाले, "हे लोकशाहीचे मंदिर आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे."


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "तुम्हाला चर्चा करायची असेल तर मी त्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला सभागृहात फक्त फलक दाखवायचे असतील तर तुम्ही दुपारी 3 नंतर सभागृहाबाहेर हे करू शकता. सभागृह चालायला हवे असे देशातील जनतेला वाटते." लोकसभेच्या अध्यक्षांनी खासदारांना ताकीद दिली की, सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही.


निलंबनाच्या कारवाईवर काँग्रेसने जारी केलं निवेदन 


खासदारांच्या निलंबनाबाबत काँग्रेसकडूनही निवेदन देण्यात आले. आमच्या खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ते लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होते.


इतर महत्वाची बातमी: 


Law Linking Aadhaar Voter ID : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांच्या आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग कायद्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 
Ex President Facilities : मोठं घर, लाखावर पेन्शन, सेवेला कर्मचारी आणि बरंच काही... निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना आयुष्यभर मिळतात या सुविधा
Indian Railway News: रेल्वेचा विना तिकीट प्रवास करताय? प्रवासादरम्यान कॅश नसेल तर घाबरू नका, हे वाचा