मुंबई : शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) होत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्कात शिवतीर्थवर होणार आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी ठाकरे आणि शिंदे समर्थक सकाळपासूनच जमण्यास सुरुवात झाली आहे.
ठाकरे गटाकडून कोण कोण बोलणार याबाबत उत्सुकता आहेच. पण शिंदे गटाने आपल्या वक्त्यांच्या यादीत एक नवं नाव समाविष्ट केलं आहे. ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत (Sanjay Raut), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) भाषणं करणार आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेकडून कोण कोण बोलणार?
एकनाथ शिंदे यांच्याशिवाय चार प्रमुख नेते भाषण करणार आहेत. या चार नेत्यांची यादी शिंदे गटाने जाहीर केली आहे. यामध्ये रामदास कदम, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश असेल. यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील.
सुषमा अंधारेंना तगडी फाईट
दरम्यान, सुषमा अंधारेंना तगडी फाईट देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून खास तयारी करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील नवा पर्याय शोधला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे या आज भाषण करणार आहेत.
कोण आहेत ज्योती वाघमारे?
सोलापुरातील चळवळ येथील कार्यकर्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांची शिवसेनेचे राज्य प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेना राज्य प्रवक्ता आणि संपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा अशा दोन जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत.
आंबेडकरी चळवळतील आक्रमक चेहरा, उत्तम निवेदिका, फर्ड्या वक्त्या म्हणून सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या ज्योती वाघमारे आता शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडताना दिसतात. मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर देण्यासाठीच ज्योती वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ज्योती वाघमारे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली होती. पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणाऱ्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला होता.
कोण आहेत प्रा.डॉ.ज्योती वाघमारे? (Who is Jyoti Waghmare)
सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख
शैलीदार निवेदिका, फर्ड्या वक्त्या म्हणून परिचित
मातृभाषा तेलगू, इंग्रजी भाषेत पीएचडी, मराठीवर प्रभुत्व असल्याने वक्तृत्वाने मंच गाजवण्यात कुशल
मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतीक चळवळ, आंबेडकरी चळवळ इत्यादी माध्यमातून कार्य
वडील नागनाथ वाघमारे दलित पँथरचे कार्यकर्ते, एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिलं.
ज्योती वाघमारे यांनी देखील 2014 मध्ये सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं पण नंतर राजकारणापासून अलिप्त झाल्या
राजकारणापासून अलिप्त झालेल्या ज्योती वाघमारे यांनीआता 2023 मध्ये पुन्हा एकदा राजकारणात एंट्री केलीय
त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या टिकेला विशेषतः सुषमा अंधारे यांच्याकडून होणाऱ्या टिकेला वाघमारे यांच्याकडून कसं प्रतिउत्तर मिळतं हे पाहावं लागेल