State Women Commission: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबई येथे महिला आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या काही माजी सदस्या आणि महिला क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीवरुन रणकंदन माजले आहे. या बैठकीत विदर्भातील महिला चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व नसल्याने महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे (Asha Mirge) यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटानेही नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना लक्ष्य केले आहे. नीलम गोऱ्हे कोणत्या अधिकारात आजची बैठक घेत आहेत? त्यांच्या सिलेक्टेड लोकांना नीलम गोऱ्हे यांनी बैठकीला बोलावले आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
निलम गोऱ्हे यांना या सगळ्यांमध्ये केंद्रस्थानी राहायचं आहे. त्यासाठी त्यांनी ही बैठक बोलावली आहे, अनेक वर्षांपासून आम्ही नीलम गोऱ्हे यांना पाहतो, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. नीलम गोऱ्हे यांनी आजच्या बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्या लोकांनाच बैठकीला बोलावले आहे. निमंत्रण जरी मिळाला असतं तरी आम्ही त्या बैठकीला गेलो नसतो, स्वतःला केंद्रबिंदू म्हणून आपल्याकडे बघायचं ही नीलम गोऱ्हे यांची जुनी स्टाईल आहे. विधान परिषद उपसभापती म्हणून जर तुम्ही बैठक बोलत असाल तर सगळ्याच पक्षाच्या महिला नेत्यांना का बोलवलं नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोलण्याचा आणि त्या संदर्भात विचार करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे नीलम गोऱ्हे यांचा नाही, असेही सुषमा अंधारे यांनी सुनावले.
विदर्भातील 11 जिल्ह्यातील एकाही महिलेला बैठकीचं निमंत्रण नाही, आशा मिरगेंची नीलम गोऱ्हेंवर आगपाखड
फक्त विदर्भातील महिला आयोगाच्या माजी सदस्यांनाच नव्हे तर यशोमती ठाकूर महिला बालकल्याण खात्याचा कारभार सांभाळलेल्या लोकप्रतिनिधीनांही या बैठकीचे निमंत्रण नाही. महिला क्षेत्रात काम करणाऱ्या कुणालाही बोलावलं असतं तर चाललं असतं. मात्र विदर्भात महिलांवर अत्याचार होतच नाहीत का? महिलांवर अत्याचार फक्त पुणे, मुंबईतच होतात का? तिकडे होणाऱ्या अत्याचारांवर उत्तर शोधण्याची समज फक्त तिकडल्याच राजकारण्यांना आणि समाजसेविकांना आहे हा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे. मला भाबडा प्रश्न पडला की विदर्भात महिलांवर अत्याचार होत नाहीत का? महिला आयोगावर काम केलेल्या चंद्रपूरच्या विजया बांगडे नागपूरच्या आभा पांडे, नीता ठाकरे आणि महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेल्या यशोमती ठाकूर या कुणालाच बैठकीचा निमंत्रण नाही? मला बोलावलं नाही हा प्रश्नच नाही. परंतू, विदर्भातील 11 जिल्ह्यातील एकाही महिलेला या बैठकीचं निमंत्रण नाही. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ही लुटूपुटूची बैठक, अशी टीका आशा मिरगे यांनी केली.
आणखी वाचा