Supriya Sule on Eknath Khadse, Baramati : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करण्याच्या म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मी भाजपमध्ये परतणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्वत: एबीपी माझाला सांगितले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती येथे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. 


काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?


मला एकनाथ खडसेंबाबत काहीच माहिती नाही. त्यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. आज सकाळीच रोहिनी खडसेंची भेट झाली होती. रोहिनी खडसे आणि मी जवळपास एक तास सोबत होतो. त्यांनी मला खडसेंची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाची अडचण सुरु आहे. त्यांच्यावर स्ट्रेस आणि टेंशन आहे. त्यामुळे आम्हालाही एकनाथ खडसे यांची काळजी असते. रोहिनी खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत काही भाष्य केलं नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितलं. 


ज्यांच्यावर आरोप झाले ते भारतीय जनता पक्षात जाणार 


पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाईल की नाही माहिती नाही. मात्र, ज्या काँग्रेसच्या विरोधात रान पेटवलं. काँग्रेसमुक्त भारत करणार म्हणत होते. आम्हाला वाटलं काँग्रेस मुक्त भारत म्हणजे काँग्रेसची सत्ता कमी होणार आहे. आम्हाला माहिती नव्हते की, काँग्रेसचे सर्व नेते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते भारतीय जनता पक्षात जाणार आहेत. लोकांचे प्रेम कमवून आणि कामाची निष्ठा ठेऊन माझं काम चालू आहे. एखाद्या सीटवर वाद होत असतो. आमच्याकडे लोकशाही आहे. आमचे उमेदवार आम्ही ठरवतो. आमचे उमेदवार मोठा पक्ष ठरवत नाही, असा टोलाही सुळे (Supriya Sule) यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 


उपाययोजना करण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे


आपल्याकडे लोकशाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी कोणाची लढाई कोणाबरोबर आहे, याचा विचार करत नाही. माझ्या मतदारसंघात दुष्काळ आहे. गेले तीन महिने मी सर्वांना सांगत आहे की, पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात गंभीर होत चालला आहे. उपाययोजना करण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे. सरकार कोणावरही उपकार करत नाही. सरकारने पाणी दिलच पाहिजे. टँकर सुरु झालेच पाहिजेत. छावण्या सुरु केल्या पाहिजेत. नियोजनबद्ध पाणी सोडण, हे सरकारचं काम आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal : लोकसभेवरून राजकारण तापलेले असतानाच भुजबळ फार्मवर ड्रोनद्वारे रेकी? पोलीस बंदोबस्त वाढवला