Sharad Pawar & Aji Camp NCP: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट भविष्यात एकत्र येणार नाहीत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. अजितदादा गटाच्या बोलण्यात किती विरोधाभास आहेत बघा, आजही ते शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचे नेते आहेत, असे सांगतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत हे सांगतात, एकत्र आले पाहिजे सांगतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा एकत्र येत नाहीत. याचा अर्थ मोदींच्या मुख्य दुकानासोबत त्यांना आपले दुकान चालवायचे आहे. प्रफुल पटेल महान नेते नाहीत, तटकरे आता अध्यक्ष आहेत, उद्या हा पक्ष विलीन होणार नाही अशी माझी माहिती आहे. पण झाला तर सुनील तटकरे यांनी काय करायचे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या प्रदेशाध्यपद आणि केंद्रातील मंत्रीपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राऊतांच्या या वक्तव्यावर आता सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 

या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कम्युनिकेशन गॅप आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही. आता शिंदे एका बेटावर उभे आहेत. अजित पवार दुसऱ्या टोकाला आहेत, आणि फडणवीस एका ठिकाणी आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा संवाद पक्का होता. हा संवाद कोमात का गेला, याचा विचार फडणवीसांनी करावा. अजित पवार यांचा सर्वात उत्तम संवाद हा उद्धव ठाकरे यांच्याशी होता. आता या संवादात मिठाचा खडा का पडतो आहे. याचा अर्थ सर्वकाही आलबेल नाही, दहशतीपोटी, भीतीपोटी एकत्र राहिले आहेत, आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून सगळे एकत्र आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. निवडणुकीत जिंकू दे अथवा हरु दे, शरद पवार हे सातत्याने राजकारण करत राहतात.  ते या वयातही मेहनत करतात, असे फडणवीसांनी म्हटले होते. याविषयी विचारणा केली असता राऊत यांनी म्हटले की, शरद पवार सगळ्यांपेक्षा मोठे आहेत, त्यांच्या कौतुकाने पवार मोठे होते नाहीत, ते आधीपासून टोलेजंग आहेत, अशी टिप्पणी राऊतांनी केली. 

Sanjay Raut: महिला आयोगावर राजकीय नेत्यांची नियुक्ती नको: संजय राऊत

महिला आयोगावर अराजकीय सदस्य असायला हवेत. इकडे राजकीय नेत्याच्या जवळच्या महिला यांची नियुक्ती केली जाते, कारण त्याला कॅबिनेट दर्जा आहे. मात्र राज्य महिला आयोग असेल किंवा केंद्रीय महिला आयोग असेल तिकडे अराजकीय महिलांनाच अध्यक्ष आणि सदस्य नेमायला हवे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेवरही भाष्य केले. उदय सामंत यांना चंद्रहार पाटील वारंवार भेटतात आणि त्यावर ते खुलासा देखील करतात, ठीक आहे आता त्यांच्याशी मी चर्चा करेन , असे राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी : आम्ही विचाराने एकच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, शरद पवारांनी पत्ता टाकला!