Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची (Vaishnavi Hagawane Death Case) सध्या जोरदार चर्चा आहे. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हा अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाने आता राजकीय वातावरणही तापले आहे. याच प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर आता रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी वैष्णवी हगवणेप्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस होते. त्यामुळे तपास पारदर्शक होत नव्हता. ज्यावेळी प्रकरण सीआयडीकडे गेले, त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे सीआयडी तपासातून पुढे आले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणातही मोठे पॉलिटिकल नेक्सस आहे. त्या आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत, अशी शंका येते. माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर रोहिणी खडसे यांनी एक व्हिडीओ देखील जारी केला आहे. यात रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, वैष्णवी हगवणे प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला, त्या दिवशी तिचे आई-वडील तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले, तेव्हा दीड दिवस मृत्यूबाबतची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर जे कलम लावण्यात आले ते सौम्य प्रकारचे होते. वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच हे उघड होतं की, तिच्या अंगावर 29 ठिकाणी जखमा आहेत. हे प्रथमदर्शनी अहवालामध्ये देखील नमूद आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
तिला क्रूरपणे मारहाण झालेली आहे. हे तिच्या शरीरावरील जखमांवरून दिसून येते. जर तिच्या शरीरावर 29 ठिकाणी जखमा असताना त्या एफआयआरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, जीव जाईपर्यंत मारहाण करणे किंवा अशा अनेक कठोर कलमांचा त्यामध्ये समावेश का करण्यात आला नाही? कुठेतरी आरोपींना मदत होईल अशा रीतीने ती एफआयआर नोंदवली गेली होती का? ज्या एफआयआरची आज आरोपी असलेल्या लोकांना मदत होत आहे. त्याच आधारावर आरोपीचे वकील हे वैष्णवीच्या चारित्र्यहननापर्यंत पोहोचलेले आहेत. माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या प्रकरणात राजकीय दबाव आहे का? पोलीस यंत्रणेवर दबाव आहे का? कारण जे आरोपी आहेत ते राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे कुठलाही दबाव पोलिसांवर असू नये, अशी सगळ्यांची अपेक्षा असताना या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.
वैष्णवी हगवणेची केस सीआयडीकडे वर्ग करा
वैष्णवी हगवणे प्रकरण हे सीआयडी कडे वर्ग करण्यात यावे, जशी बीडच्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. जेव्हा केस सीआयडीकडे वर्ग करण्यात आली, त्यानंतर त्यातील संदर्भात अनेक सत्य बाहेर यायला मदत झाली. तसेच वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात अजूनही सत्यता लपवली जात आहे. त्यामुळे ही केस लवकरात लवकर सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी, जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा