बारामती, पुणे: केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा (Baramati Lok sabha Election) मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यानंतर पवार घराण्यात पहिल्यांदा थेट  लढत होत आहे. सुप्रिया सुळे (Suprya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या रुपाने माजी कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात हा सामना होत आहे. दोन्ही बडे नेते राजकीय टीका करत आहेतच पण आता पवार घराण्यातील वादही महाराष्ट्रासमोर येत आहे. 


याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमदेवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. पवार घराण्याचा वाद, बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत, पवार विरुद्ध पवार, सासर-माहेर वाद आणि एकूणच राज्याचं बदलेलं राजकारण या सर्व मुद्द्यांवर सुनेत्रा पवार यांना एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी बोलतं केलं. ही मुलाखत आज रात्री 8 वाजता एबीपी माझाच्या झीरो अवर कार्यक्रमात पाहू शकाल. 


अजितदादांच्या दाव्यापेक्षा जास्त मतं मिळणार


यावेळी सुनेत्रा पवार यांना बारामतीतील विजयाबद्दल विचारण्यात आलं. अजितदादा तर म्हणतात की सुनेत्रा पवार लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांचा हा दावा मला मान्य नाही, मी त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. बारामतीची जनता नेहमीच दादांच्या मागे उभी राहिली आहे. दादांनीही नेहमीच बारामतीकरांसाठी सर्वस्व दिलं आहे. त्यामुळे बारामतीकर यावेळीही त्यांच्या मागे उभे राहतील आणि दादांनी दावा केल्यापेक्षा जास्त मतांनी म्हणजेच दीड दोन लाखापेक्षा जास्त फरकाने मला निवडून देतील"


सासर-माहेर वादावर भाष्य


यावेळी सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांनी केलेल्या सासर-माहेर वक्तव्यावरही भाष्य केलं. पवार हे नाव बघून मतदान करा असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी मूळचे आणि बाहेरचे पवार कोण हे बघा असं म्हटलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यावर सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलं, ते तुम्ही आजच्या मुलाखतीत पाहू शकाल. 


कुटुंब कायम राहील


कुटुंबात राजकारण आलं असलं तरी कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. राजकारण होत राहील पण कुटुंब कायम राहील, असं त्यांनी नमूद केलं. 


बारामतीकर हेच माझं कुटुंब 


माझं कुटुंब माझ्या सोबतच आहे, बारामतीकर हेच माझं कुटुंब आहे, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. 


संबंधित बातम्या  


Ajit Pawar VIDEO: आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ दे, उद्या मंत्री करतो : अजित पवार


मोठी बातमी : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी!