अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत राज्यात महत्त्वाच्या लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या जोरदार लढत झाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर निलेश लंकेंनी 28 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर, भाजप महायुतीचे (BJP)  पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)  यांनी लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली त्यावर अहमदनगरचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली. सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा, असा खोचक टोला लंकेंनी लगावला आहे. 


सर्वोच्च न्यायालयाच्या व्हीव्हीपॅट प्रकरणी निकालाचे पहिले लाभार्थी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे ठरले आहेत. सुजय विखे यांनी आज व्हीव्हीपॅट पडताळणीचे 21 लाख रुपये भरले आहेत. विखे यांनी 21 लाख भरुन सर्वोच्च न्यायालयात शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, संबंधित याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी फेटाळली. पण, सुजय विखे यांच्या याचिकेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  


सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश


ईव्हीएमवर एखादा उमेदवार आक्षेप घेऊ शकतो. 


कोणत्याही मतदारसंघात ईव्हीएमवरून आक्षेप घेण्यात आला तर संबंधित मतदारसंघात पाच टक्के ईव्हीएम मशीनची बर्न्ट मेमरी तपासली जाईल. त्यासाठी आक्षेप घेणाऱ्या उमेदवाराने ईव्हीएम पडताळणीचा सगळा खर्च उचलायचा आहे. 


ईव्हीएम पडताळणीसाठीची अधिकृत विनंती निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत करावी लागेल.


दरम्यान, सध्या सुजय विखे यांनी भरलेले 21 लाख रुपये म्हणजे ईव्हीएमच्या तांत्रिक पडताळणीचा खर्च आहे.


विविध मतदान केंद्रांसासाठी 21 लाख भरले


सुजय विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 21 लाख रुपयांचं शुल्क भरलं आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10,पारनेर 10, नगर  5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव झाला आहे.


सुजय विखेंचा केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप - लंके


सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिला आहे. विखे कुटुंबाला इतिहास आहे. यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून असंच करण्यात आल्याचे लंके म्हणाले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत एक प्रकारे केंद्रीय यंत्रणांवरच विखेंनी आक्षेप घेतला आहे, असे लंकेंनी म्हटले.