Maharashtra Political Updates : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) मोठी उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2024) तोंडावर भारत राष्ट्र समिती पक्षाचे (Bharat Rashtra Samithi) अध्यक्ष आणि तेलंगणाचे (Telangana) माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांना मोठा धक्का बसणार आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिन होणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं समोर येत आहे.
महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील बीआरएसचे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत बीआरएसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. राज्यातील बीआरएस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक पार पडणार आहे.
पवारांच्या उपस्थितीत 6 ऑक्टोबरला सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
विधानसभा निवडणुकांपू्र्वी शरद पवारांची मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकांपूर्वी बीआरएस पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता. मोठं शक्तिप्रदर्शन करत भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागपुरात पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. पण, अवघ्या काही महिन्यांतच महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता गाशा गुंडाळणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. येत्या 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षातील सर्व पदाधिकारी थोरल्या पवारांच्या पक्षात विलिन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, तेलंगणातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या बीआरएसची गेल्या दोन निवडणुकांमध्ये पिछेहाट झाल्याची पाहायला मिळाली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवत बीआरएसचा दारुण पराभव केला होता.