दरम्यान यावरुन आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केलीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या जाऊ द्या त्याला माफ करा या भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट करत सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. विशेष दूत यांनी जाणीवपूर्वक हा मार्च चिरडला, असं सूचक वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. तर सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे हा प्रश्न धसास लावणारा दलाल कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होतोय.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सुरेश धस सांगतात...तसं चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करु...धससाहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा...फिट्टमफाट हिशोब होईल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नये- सचिन खरात
भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नये अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे ज्या पोलिसांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली, ज्या पोलिसांनी वत्सला मानवतेला मारहाण केली ज्या पोलिसांनी निकिता वाटोरे यांना मारहाण केली. ज्या पोलिसांनी आमच्या सुशिक्षित भीमसैनिकांना जबर मारहाण केली त्या पोलिसांची बाजू भाजप आमदार सुरेश धस घेत आहात का? त्यामुळे भाजपा आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणांमध्ये लुडबुड करू नये, न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंबेडकरी जनता आणि आंबेडकर नेते खंबीर आहोत, असं सचिन खरात यांनी म्हटलं आहे.