मुंबई : राज्यातील महायुतीच्या व भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हणत उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच, महाविकास आघाडी व महायुतीमधील दोघांच्या मतांमधील फरकाची आकडेवारी सांगत, आम्हाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील 6 जागांपैकी 2 जागांवर आम्हाला विजय मिळाला, पण 6 जागांवरही आम्हाल भरगोस मतं मिळाल्याचं  फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, निवडणूक प्रचारात काही नेरेटीव्ह तयार करण्यात आला, संविधान बदलणार आहेत, असा अपप्रचार केला, त्याचा फटका महायुतीच्या (Mahayuti) बसल्याचंही फडणवीस यांनी मान्य केलं. 


लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून गत 2019 च्या निवडणुकीत 23 जागा जिंकलेल्या भाजपला यंदा केवळ 9 जागांवर विजय मिळाला आहे. तर, महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवत महायुतीला मोठा दणका दिला. महायुतीच्या पराभवानंतर आता महायुतीमधील तिन्ही पक्षात खलबतं सुरू झाली आहेत. दिल्लीत आज इंडिया आघाडी व एनडीए आघाडीच्या बैठका होत आहेत. मात्र, एनडीएच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे, महायुतीमधील तिन्ही पक्षांचा समन्वय कमी झाला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


मित्रपक्षातील समन्वयाबाबत मोठं विधान


आमच्या मित्रपक्षांसोबत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, ते आम्ही नोंद केलं असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी नेतृत्व म्हणून माझी आहे. मी पराभवाची जबाबदारी स्वीकारत असून नेकमं कुठे चूक झाली, त्याचा अभ्यास करू आणि पुन्हा जोमाने काम सुरू. नव्याने रणनिती आखून कामाला सुरुवात करू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे, महायुतीमधील तिन्ही पक्षात पुढे नेमकं काय होणार, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  


उपमुख्यमंत्रीपदापासून मला मुक्त करावं


देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचे सांगत मला आता पक्षासाठी पूर्णवेळ काम करायचं असल्याचं म्हटलं. आगामी निवडणुकांसाठी काम करायचं आहे, आता मी पक्षासाठी पूर्णवेळ काम करणार आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री पदापासून मला मुक्त करावं अशी मागणी मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानले . 



भाजपला राज्यात नाकारले नाही - फडणवीस


जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला. 


काही ठिकाणी अँटीइंकबसी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटीव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.