Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लबोल केला. एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ -दीप निवासस्थानी शिंदे गटाचे नेते दाखल झाले. खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आले नसले तरी ठाकरेंच्या मेळाव्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल : नरेश म्हस्के
दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणातून मराठीचा मुद्दा दिसून आला. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या नेहमीच्या भाषणामध्ये नटदृष्टपणा, टोमणे होते. सत्ता आणण्यासाठी आता राज ठाकरे यांची गरज आहे. केवळ एक मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये दिसला. कुठेही मराठीचा मुद्दा दिसला नाही. राज साहेबांनी या मेळाव्याबद्दल बोलले होते की, यात राजकारण असणार नाही. मराठीचा मुद्दा फक्त राज साहेब यांच्या भाषणामध्ये दिसला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये हिंदी सक्तीवर काही मुद्दे नव्हते. केवळ आता मला राज ठाकरे यांची गरज आहे. केवळ मला सत्ता आणायची आहे. आम्ही दोघं मिळून सत्ता आणू. हेच मुद्दे भाषणामध्ये होते. मराठी भाषा संदर्भात जी काही जाहिरातबाजी केली होती, ती खोटी ठरली. त्यांचे जे काही गुजराती पार्टनर आणि त्यांचे मुलांचे मित्र कोण आहेत? एकनाथ शिंदे आधी'जय महाराष्ट्र' बोलले नंतर 'जय गुजरात' म्हणाले होते.
महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना योग्य जागा दाखवली : नरेश म्हस्के
मराठी भाषिकांना भडकवणं हा एकमेव मुद्दा घेऊन आज त्यांनी भाषण केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना योग्य ती जागा दाखवलेली आहे. ते विधानसभेत 100 जागा लढतात आणि 20 जागा निवडून येतात. आजच्या कार्यक्रमात किती पदाधिकारी आमदार, खासदार, माजी नगरसेवक, किती जिल्हाप्रमुख उपस्थित होते. त्याची माहिती घ्या. त्यानंतर आमच्यावर टीका करा. या मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीला कोणीही हात लावू शकत नाही. संजय राऊत यांना जे अपेक्षित होतं ते या मेळाव्यामध्ये झालेले नाही, असे नरेश म्हस्के म्हणाले.
आणखी वाचा