मुंबई: शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचा प्रगती पुस्तक तयार झाले आहे. दोन मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पाच जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अजून खोतकर, विजय शिवतारे यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. 


या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता


यामध्ये अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर ओवळा मजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, महाडचे भरत गोगावले, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


एकनाथ शिंदे जो निर्णय देतील तो मान्य 


दरम्यान आमदार संजय राठोड यांनी एबीपी माझाशी बोलताना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय देतील तो मान्य असेल असं वक्तव्य केलं आहे. मला माझ्या मतदारसंघातील जनतेने पाचव्यांदा निवडून पाठवले आहे. मी माझ्या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्यांनी मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे, म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. 


यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? शिंदे पुन्हा एकदा जबाबदारी देतील का? यावरती बोलताना संजय राठोड म्हणाले, मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी वरिष्ठांनी दिली. मी महसूल राज्यमंत्री म्हणून देखील काम केलेला आहे. वनखात्याचा कारभार देखील मी सांभाळलेला आहे. अन्न औषध प्रशासनाचा काम देखील मी पाहिलेला आहे. जलसंधारण विभाग देखील मी पाहिलेला आहे आणि या सर्व खात्यांच्या माध्यमातून जनतेसाठी आपण काय चांगले निर्णय घेऊ शकतो. काय चांगले धोरण आखू शकतो हाच प्रयत्न केला आहे. आता परत मला जर संधी मिळाली तर मला जे काही खाते मिळेल त्या खात्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि चांगलं काम करेल असं संजय राठोड म्हणालेत. 


भाजपचे नेतृत्व आमदारांचा प्रगती पुस्तक पाहून मंत्री पदाचा निर्णय घेणार आहे यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राठोड म्हणाले, आमचा पूर्ण विश्वास आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे ते जे काही भूमिका घेतील, त्या भूमिकेला आमचा समर्थन आहे. त्यांना पूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहेत. ते योग्य निर्णय घेतील असं संजय राठोड यावेळी बोलताना म्हणाले आहेत.