मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे, राजकीय पक्ष कामाला लागले असून सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात, मुंबई महापालिकेवर आपलाच झेंडा फडकविण्यासाठीही प्रमुख नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे. शिवसेना (shivsena) शिंदे गटाकडूनही तयारी सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, कांदिवलीतील (Mumbai) मराठी माणसाचे दुकान हडप करणाऱ्या, खंडणी, मारहाण करणाऱ्या लालसिंह राजपुरोहित यांना पुन्हा एकदा शिवसेना(Eknath Shinde) पक्षात नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. राजपुरोहित यांना पुन्हा एकदा चारकोप-कांदिवली पूर्वचे प्रभारी विभागप्रमुखपद देण्यात आलं आहे. त्यामुळे, हकालपट्टी केल्याचा दिखावाच फक्त केला का, असा सवालही काही जणांकडून विचारला जात आहे.
मराठी माणसाचे दुकान हडप करणाऱ्या, खंडणी आणि मारहाण करणाऱ्या लालसिंह राजपुरोहित यांची शिंदेसेनेच्या शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा लालसिंह राजपुरोहित यांना नव्याने नियुक्ती दिल्याने शिवसेना शिंदे गटाविरोधात लोकांमध्ये मोठे नाराजी व्यक्त होत असल्याचं दिसून येतं. तसेच, राजपुरोहित यांची नवीन नियुक्ती रद्द करा, अशी मागणीही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मुंबईत शिवसेना शिंदेसेनेने नवीन नियुक्ती केली आहे, शिंदेसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लालसिंह राजपुरोहित यांची शिवेसेनेच्या प्रभारी विभागप्रमुख ( कार्यक्षेत्र- चारकोप व कांदिवली पूर्व विधानसभा ) पदी एक वर्षाच्या कालाविधीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रक शिंदे पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी जारी केले. त्यामुळे, शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या ठिकाणी मराठी भाषिक असलेली मोठी वस्ती लक्षात घेता मराठी पदाधिकाऱ्यांना प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी आहे. परत, मराठी माणसाचे दुकान हडप करणाऱ्या, खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा असलेल्या लालसिंह राजपुरोहित यांना बक्षिस म्हणून सदर नियुक्ती दिल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकनाथ शिंदेंनी केली होती हकालपट्टी (Eknath Shinde mumbai election)
दरम्यान, 28 डिसेंबर रोजी राजपुरोहित आणि त्याच्या 6 कार्यकर्त्यांविरोधात पालिकेच्या रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी पदाधिकारी व त्यांना अटक देखील केली होती. तर, कांदिवलीमधील मराठी माणसाचे दुकान हडप केल्याबद्धल राजपुरोहित यांना पक्षातून 8 मार्च रोजी निलंबित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. याप्रकरणी, त्यावेळी राजपुरोहित यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. तसेच, राजपुरोहित याची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्याने हडप केलेले दुकान शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पै. कुटुंबाच्या स्वाधीन केले. दुकानाची चावी पुन्हा मिळाल्याने दत्ताराम पै आणि सुषमा पै भावूक झाले होते. मात्र, आता पु्न्हा राजपुरोहित यांची शिवसेनेत पदावर घरवापसी झाली आहे.