Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आगामी विधानसभेत ठाकरेंची नजर प्रामुख्यानं मुंबईवर असेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 


मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या मुंबईतून शिवसेना राज्यभरात पोहोचली, तिच मुंबई जिंकण्यासाठी ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतसुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 


महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहे. ठाकरे आगामी विधानसभाही महाविकास आघाडीतून लढवणार आहेत. त्यामुळे मुंबईतील 36 जागांपैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे रहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करेल, यात काही शंकाच नाही. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी केली आहे. 


वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर यांना मिळू शकतं तिकीट 


वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना  विधानसभा निवडणुकीसाठी  ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 


महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असून महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे.  


2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे, तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचं नियोजन करत असल्याची माहिती मिळत आहे. 


2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला. तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत  अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल, असं दिसतंय. 


महाविकास आघाडीत मुंबईतील शिवसेना ठाकरे गट 'या' जागा लढण्याची शक्यता


 ठाकरेंची नजर असलेल्या संभाव्य जागा कोणत्या? 



  1. शिवडी 

  2. भायखळा 

  3. वरळी 

  4. माहीम 

  5. चेंबूर 

  6. भांडुप पश्चिम

  7. विक्रोळी 

  8. मागाठाणे 

  9. जोगेश्वरी पूर्व 

  10. दिंडोशी

  11. अंधेरी पूर्व 

  12. कुर्ला 

  13. कलिना 

  14. दहिसर 

  15. गोरेगाव 

  16. वर्सोवा

  17. वांद्रे पूर्व 

  18. विलेपार्ले 

  19. कुलाबा 

  20. वडाळा 

  21. चांदीवली 

  22. बोरिवली 

  23. मलबार हील 

  24. अणुशक्ती नगर 

  25. मानखुर्द शिवाजीनगर