Maharashtra Politics : विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळ जवळ सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया इत्यादि बाबी राज्यातील पक्षांकडून चालू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांकडून आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात महायुतील फारसे यश न आल्याचे बघायला मिळाले. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विदर्भात घरवापसी करत मोठे यश संपादन केले आहे.
परिणामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) धक्कादायक निकाला अंती विदर्भात महायुतीने काहीसे अधिक लक्ष घातल्याचे दिसून आले आहे. अशातच आता विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार असल्याची बातमी समोर आली आहे. कारण नुकतेच उद्धव सेनेतील प्रमुख नेते आणि माजी आमदार रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Thackeray Shiv Sena) पुन्हा घरवापसी करण्याची भूमिका घेतली आहे.
माजी आ. रमेश कुथे पुन्हा शिवबंधन बांधणार
शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणारे माजी आ. रमेश कुथे यांनी महिनाभरापूर्वी भाजप नेत्यांनी पक्ष प्रवेशापूर्वी दिलेल्या आश्वासनपूर्ती न केल्याचा आरोप करत भाजपला रामराम ठोकला होता. त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. दरम्यान असे असताना त्यांनी उद्धव सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत पुन्हा घरवापसी करण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी ते आपल्या समर्थकांसह काल गुरुवारी मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते आज शिवबंधन बांधणार आहेत.
कोण आहेत रमेश कुथे?
गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. आज दुपारच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर 1995 आणि 1999 या दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणुका आधी जिंकले आहेत. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर होते. मात्र त्यानंतर 2018 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजपनेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार का या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात अखेर घरवापसीचा निर्णय घेतला आहे.
अमरावतीत ठाकरे गटाला धक्का
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असताना दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी संपर्क प्रमुख गजू पाटील वाकोडे यांनी उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच त्यांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्या सह मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या