मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने आता मुंबईचा शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे. मात्र, शिवसेनेत पडलेली फूट आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरेंचा मुंबईतील बालेकिल्लाही पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता हातातून गेल्यास उद्धव ठाकरे यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून आता त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आता ठाकरे गट जुन्याजाणत्या नेत्यांची मदत घेणार असल्याचे समोर आले आहे. 


महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही तळापासून पक्षाची बांधणी करायचे ठरवले आहे. विधानसभेला जनमानसाची साथ असतानाही घडलेला प्रकार धक्कादायक होता. आम्ही त्याची कारणमीमांसा करत आहोत. त्यासाठी पक्षातील जुन्या-जाणत्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत.  महापालिका निवडणुकीला नेटाने सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मुंबईतील गटप्रमुख आणि शाखा हा आमच्या राजकारणाचा आत्मा होता. काही कारणांमुळे हा पाया हलला आहे. त्यामुळे आता या शाखा पुन्हा भक्कम करण्यासाठी आमच्या जुन्याजाणत्या शिवसैनिकांनी मार्गदर्शक म्हणून पुढे आले पाहिजे. नव्या पिढीच्या मागे पुन्हा एकदा आपला अनुभव आणि ताकद उभी केल्यास महापालिकेवरील भगवा कुणीही काढू शकणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. राज्यात आमच्या पक्षाला अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुंबईतील शिवसैनिकांनी आम्हाला साथ दिली, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 


मातोश्रीवर महत्त्वाची बैठक


काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या मुंबईतील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. ठाकरे गटाने मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे. एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार  आहे. या सगळ्या टीम उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबईच्या सर्व प्रभागांमधील परिस्थितीचा आढावा सादर करणार आहेत. अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करुन ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेची रणनीती आखण्यात येईल. त्यामुळे आता मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. महायुती सरकार मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लावणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


आणखी वाचा


विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं