मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसलळी आहे. विरोधकांनी तर अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आंदोलन केलं आहे. शाहांनी राज्यसभेत केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही पडले आहेत. विरोधकांच्या या भूमिकेविरोधात अमित शाहांचा बचाव करण्यासाठी भाजपानेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. असे असतानाच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हातातील एका पोस्टचा संदर्भ घेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अंधारे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी शेअर केला अशोक चव्हाणांचा फोटो
सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी अशोक चव्हाण यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चव्हाण यांच्या हातात एक पोस्टर आहे. या पोस्टवर 'काँग्रेसने किया बाबासाहेब आंबेडकरजी का अपमान. बाबासाहेब आंबेडकरजीको दो बार चुनाव हराया... काँग्रेस माफी मांगो' असे लिहिलेले आहे. याच पोस्टरवर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे.
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात, खायचं कुडव्याच आणि गायचं उडव्याचं. एवढा मोठा साक्षात्कार आपल्याला काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपद उपभोगताना का बर झाला नाही ? सध्या आपल्याला 66 वे वर्ष चालू आहे. वय वर्ष 65 होईपर्यंत आपल्या दोन पिढ्या याच काँग्रेसच्या लाभार्थी राहिल्या. तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही? असा रोखठोक सवाल अंधारे यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे.
आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरचं शहाणपण सुचतंय का?
तसेच, काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्रिपद त्याचवेळी त्यांच्याच तोंडावर भिरकावून देत हा फलक तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपानी हातात का घेतला नाही ? ज्या काँग्रेसच्या नावाने फलक हातात घेतला आहे, त्या काँग्रेसच्याच जीवावर शाळा, कॉलेज, डेअरी, डाळ मिल, ऑइल मिल, पेपर मिल, साखर कारखाने, मेडिकल कॉलेज, करोडोचे टेंडर्स, लाभाच्या जागा, पुढच्या पाच-पन्नास पिढ्यांना पुरेल एवढी जायदाद कमवल्यावर आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरचं शहाणपण सुचतंय का? असंही सुषमा अंधारे यांनी विचारलंय.
"इथे मुद्दा काँग्रेसने काय केलं किंवा भाजपने काय केलं हा असूच शकत नाही. मुद्दा एका तडीपार माणसाकडून बाबासाहेबांच्या संदर्भाने झालेला उल्लेख यावर तुमची काय भूमिका आहे ते आधी सांगा," असे आव्हानच अंधारे यांनी अशोक चव्हाण यांना केलंय.
हेही वाचा :