Bhaskar Jadhav : जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं. शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांयचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना दिला. 


पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांची तीव्र नाराजी


निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावाने फर्मान काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असंही भास्कर जाधव म्हणाले. चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल काढल्याचं पाहायला मिळालं. सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हेदेखील यावेळी बैठकीला उपस्थित होते. 


विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा फटका


भास्कर जाधव यांनी अनेकवेळा पक्षासंदर्भात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा फटका बसला आहे. त्यामुळं पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल असेही भास्कर जाधव यांनी यापूर्वी म्हटलं होतं. शिवसेनेला पुन्हा उभारी येण्यासाठी काही बदल गरजेचे असल्याचेही जाधव म्हणाले होते. या विधानसभा निवडणुकीत कोकण पट्ट्यात मी एकमेव आमदार शिवसेना ठाकरे गटाचा निवडून आलो आहे.  त्यामुळं पक्षाच्या लोकांना शिवसैनिकांना शासनदरबारी योग्य तो मान मिळाला पाहिजे असेही भास्तर जाधव यांनी म्हटलं होतं. 


महत्वाच्या बातम्या:


धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...