Maharashtra Politics : शिवसेनेने (Shiv Sena) बेईमानी केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी अमित शाहांच्या कार्याचा आढावा घेताना, फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. 


शिवसेनेने बेईमानी केली होती
"आज राज्यात परिवर्तन झाले आहे. आपल्यासोबत शिवसेनेने बेईमानी केली होती. बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena)  पुन्हा भाजपसोबत (BJP) एकत्र आली. या परिवर्तन काळात एक नेता ताकदीने आपल्या पाठिशी होता. त्या नेत्यावर आज एक पुस्तक प्रकाशन होतंय", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


2014 साली मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत भेटी घेतल्या. गरिबापासून श्रीमतांपर्यंत विचार पोहोचवले. आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. 117 ते 118 जागा लढणाऱ्या भाजपाने 288 जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.


अमित शाह भारताला मिळालेले बलशाली नेतृत्त्व 
हे पुस्तक संग्रह करुन ठेवण्यासारखे आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही पान उघडले तरी ज्ञानवर्धक अशी पुस्तकाची रचना आहे. अमित शाह यांच्या विचारांचे आणि वाक्याचे संकलन पुस्तकात आहे. सारवर्धक आणि मूल्य वर्धन करणारी ही वाक्ये आहेत. जे पुस्तक वाचतील, त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल. पक्षाची विचारधारा त्यांच्या वाक्यातून स्पष्ट होते. पक्षासाठी समर्पित नेतृत्व अमित शाह भारताला मिळालेले बलशाली नेतृत्त्व आहे.


खून की नदिया नहीं, विकासाची गंगा वाहिली
कलम 370 हटवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. "खून का नदिया बहेंगी" अशा वल्गना त्यावेळी केल्या. खून की नदियां बही नही उलट विकासाची गंगा वाहत आहे. नक्षलवाद, पीएफआय, आतंकवादी विरोधात ज्याप्रकारे ते कारवाई करत आहेत. दृढता दाखवत आहेत, त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेत प्रभावी झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य प्रेरणास्थान 
अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांना मानणारे आहेत. छत्रपतींचा इतिहास त्यांना तारखांनुसार माहिती आहे. त्यांनी त्यावर पुस्तक लिहिले आहे. लवकरच त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. संवेदनशील मनाचे अमित भाई आहेत. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजप, मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी (Pawan Tripathi Vichar Pushpa) यांनी संकलित केलेल्या 'विचार पुष्प' पुस्तिकेचे प्रकाशन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्याला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.